महाबळेश्वर प्राचीन मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी शिवसेनेची तहसिलदारांकडे मागणी
महाबळेश्वर (प्रतिनिधी): श्री महाबळेश्वर एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून येथे श्री स्वयंभू शंकर महादेव (श्री महाबळेश्वर मंदिर), अतिबलेश्वर व पंचगंगा कृष्णामाई अशी अती प्राचीन मंदिरे आहेत. तसेच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांची सुवर्णतुला याच पवित्र स्थळी झाल्याचे ऐतिहासिक संदर्भ आहे.
सध्या हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय होत असले तरी हजारो भाविक मंदिराला भेटी देतात मंदिराचे धार्मिक आणि सांस्कृतिक पावित्र्य अबाधित ठेवणे गरजेचे असल्याने, भाविकांनी मंदिरात प्रवेश करताना संपूर्ण पोशाख परिधान करणे बंधनकारक करावे, अशी मागणी शिवसेना पक्षाकडून करण्यात आली आहे.
या संदर्भातील निवेदन महाबळेश्वर तालुक्याचे तहसिलदार सचिन मस्के यांना सादर करण्यात आले. या वेळी वाई विधानसभा प्रमुख वर्षाताई आरडे, उपतालुका प्रमुख मंगल फळणे, उपशहर प्रमुख शीतल ओतारी, उपतालुका प्रमुख स्वाती पवार, शिवसेना संघटक शमिका वाईकर, सुरेखा पंडित, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख राजेंद्र पंडित, किरण आरडे, सुभाष फळणे तसेच ओबीसी तालुका प्रमुख उस्मानभाई खारखंडे उपस्थित होते.
