सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » आध्यात्मिक वारसा जीवनाला सकारात्मक दिशा देतो: श्री. गोरख चव्हाण

आध्यात्मिक वारसा जीवनाला सकारात्मक दिशा देतो: श्री. गोरख चव्हाण

आध्यात्मिक वारसा जीवनाला सकारात्मक दिशा देतो: श्री. गोरख चव्हाण

किसन वीर महाविद्यालयात ‘आध्यात्मिक वारसा आणि यशस्वी जीवनाचे मानसशास्त्र’ विषयावर व्याख्यान

वाई : जनता शिक्षण संस्थेचे किसन वीर महाविद्यालय, वाई येथील मानसशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘टी अँड टॉक सिरीज’ अंतर्गत ‘आध्यात्मिक वारसा आणि यशस्वी जीवनाचे मानसशास्त्र’ या विषयावर शिवकृपा पतसंस्था लिमिटेड, मुंबईचे संस्थापक व अध्यक्ष श्री. गोरख चव्हाण यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. आनंद घोरपडे यांनी जनता शिक्षण संस्थेच्या वाटचालीचा व इतिहासाचा आढावा घेतला. संस्थेने शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचा उल्लेख करताना महाविद्यालयातील विविध शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. तसेच मानसशास्त्र विभागाची स्थापना, विभागामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांसाठी समुपदेशनाच्या माध्यमातून केले जाणारे कार्य आणि विभागाच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा त्यांनी आढावा घेतला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. गोरख चव्हाण आणि सौ. इंदुमती चव्हाण तसेच न्यानदीप हायस्कूलचे चेअरमन श्री. दिलीप चव्हाण यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी सत्कार केला.

मार्गदर्शन करताना श्री. गोरख चव्हाण यांनी भारतीय आध्यात्मिक परंपरा आणि यशस्वी जीवन यांचा संबंध विविध उदाहरणे व स्वतःच्या अनुभवांच्या आधारे स्पष्ट केला. अध्यात्म हे केवळ धार्मिक कर्मकांड नसून व्यक्तीला सकारात्मक विचार, मानसिक स्थैर्य, आत्मपरीक्षण आणि योग्य जीवनदृष्टी देणारी प्रक्रिया आहे, असे त्यांनी सांगितले.

अध्यात्माचा दैनंदिन जीवनात कशा पद्धतीने उपयोग होऊ शकतो, याबाबत त्यांनी आपले अनुभव कथन केले. प्रामाणिकपणा, संयम, सद्वर्तन, चांगली संगत, सात्विक आहार, व्यायाम आणि सकारात्मक विचार यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. जीवनातील समस्या व ताणतणावांना सामोरे जाताना समस्या सोडविण्याची क्षमता, मानसिक स्थैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. गोरख चव्हाण यांनी आपल्या नर्मदा परिक्रमा तसेच कैलास-मानस सरोवर यात्रेतील अनुभव उपस्थितांसमोर मांडले. या प्रवासातून मिळालेले अनुभव, प्रतिकूल परिस्थितीत संयम राखणे, आत्मशिस्त, श्रद्धा आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचे जीवनातील महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. भगवद्गीतेचे पठण व अध्ययन यामुळे मनावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांवरही त्यांनी विशेष प्रकाश टाकला. गीतेतील विचार व्यक्तीला कर्तव्याची जाणीव करून देतात, मन स्थिर ठेवण्यास मदत करतात आणि जीवनातील संकटांना सामोरे जाण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन देतात, असे त्यांनी सांगितले. व्याख्यानाच्या शेवटी उपस्थितांना भगवद्रीता आणि हरिपाठाच्या प्रती श्री. गोरख चव्हाण यांच्या वतीने भेट देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी श्री. गोरख चव्हाण यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा व समुपदेशनपर विचारांचा संदर्भ देत धर्म कोणताही असो, तो माणसाला चांगले वागण्याची आणि चांगले जीवन जगण्याची शिकवण देतो, असे मत व्यक्त केले. आजच्या विद्यार्थ्यांसमोरील वाढत्या समस्या आणि आव्हानांचा उल्लेख करताना डॉ. फगरे म्हणाले की, मानसशास्त्र विविध शास्त्रीय पद्धतींच्या माध्यमातून या समस्यांवर उपचार व समुपदेशन करीत आहे; मात्र आपल्या समृद्ध आध्यात्मिक वारशातून मिळणारे विचार आणि मूल्ये विद्यार्थ्यांना मानसिकदृष्ट्या निश्चितच काही प्रमाणात मदत करू शकतात. श्री. गोरख चव्हाण यांच्या नर्मदा परिक्रमेतील अनुभवांचा उल्लेख करून, त्यांच्या अनुभवातूनही जीवन जगण्याबाबत काही महत्त्वाचे शिकता येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. गोरख चव्हाण यांनी आपल्या पतसंस्थेच्या सर्व शाखांमधील अधिकारी, कर्मचारी व सर्व संचालकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी तयार केलेले व्यायामाचे अॅप हा एक अतिशय उपयुक्त उपक्रम आहे असे प्रतिपादन डॉ. फगरे यांनी केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थेच्या कामकाजात सुलभता आणण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. वीणा जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमानंतर श्री. गोरख चव्हाण व सौ. इंदुमती चव्हाण यांनी संपूर्ण महाविद्यालयाचा परिसर तसेच महाविद्यालयामध्ये असलेले हायड्रोफोनिक्स, मशरूम उत्पादन प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, फॅशन डीझायनिंग, औषधी वनस्पती उद्यान, इंडोर स्पोर्ट्स हॉल, वासातीगृह व आमराई इ. ठिकाणी भेट दिली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket