सहकारभूषण धन्वंतरी पतसंस्था वर्धापनदिन व धन्वंतरी पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न
सातारा : सहकार क्षेत्रात अग्रणी असणाऱ्या व सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेचा ३७ वा वर्धापनदिन शुक्रवारी, १६ रोजी संपन्न झाला. पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या धन्वंतरी सभागृहामध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वर्धापनदिनाचे औचित्य साधून व सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मा. संचालक मंडळाने माउली ब्लड बँक, सातारा यांच्या सहकार्याने सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सदर शिबिरात सभासद, संचालक, सेवक आणि हितचिंतक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदानाचे पवित्र कार्य केले.
दुपारी ४ वाजता ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्रा अनिल बोधे व वनसंवर्धन अधिकारी श्री. हाकेसाहेब या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
कला, क्रीडा, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आपल्या सभासदांना पतसंस्थेतर्फे प्रतिवर्षी धन्वंतरी पुरस्कार दिला जातो. यंदाच्या सोहळ्यात सन २०२२-२३, २३-२४, २४-२५ व २०२५-२६ या वर्षांसाठी मा. संचालक मंडळाने अनुक्रमे मा. डॉ. विलास शहा, डॉ. विजयकुमार सुखटणकर, डॉ. सुभाष हिरवे, डॉ. सुधाकर लावंड, डॉ. महादेव मोरे, डॉ. सुधाकर बेंद्रे, डॉ. दिलीप पटवर्धन, डॉ. श्रीरंग कुंभार, डॉ. सुधीर पवार, कै. डॉ. कन्हैयालाल लाहोटी, कै. श्री. अरुण गोडबोले, डॉ. सौ. प्रिया शिंदे यांना मानाचा धन्वंतरी पुरस्कार देऊन प्रमुख पाहुणे, संस्थापक चेअरमन डॉ. रवींद्र भोसले व व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
रोख रक्कम, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. तसेच गत ३७ वर्षे संस्थेवरील विश्वास व प्रेम दृढ केलेल्या सभासदांचेही मा. संचालक मंडळ सदस्य व मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. रवींद्र भोसले म्हणाले, धन्वंतरी पतसंस्था ही मुख्यतः वैद्यकीय व व्यावसायिक यांचेकरिता स्थापन करण्यात आली होती. सहकार कायद्यात झालेल्या बदलानंतर सर्व वर्गासाठी ती खुली झाली. पतसंस्थेशी जुन्या पिढीतील लोक जोडले गेलेले आहेतच, परंतु नव्या पिढीचा उत्तम प्रतिसाद मिळण्याच्या दृष्टीने संस्थेने डिजिटल बँकिंग सुरु केले असून स्वतःचे डाटा सेंटर कार्यान्वित केलेले आहे. त्यामुळे मोबाईल बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, इ. अत्याधुनिक सुविधा संस्था विनासायास ग्राहकांना देत आहे. आजमितीस पतसंस्थेला आदर्श पतसंस्था म्हणून विविध सन्मान, पुरस्कार मिळून पतसंस्था यशाच्या शिखरावर विराजमान आहे. हे सर्व सभासदांमुळे शक्य झाले आहे व यापुढेही संचालक मंडळ सभासदाभिमुख कार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी बोलताना ज्येष्ट सभासद डॉ. सुधाकर बेंद्रे, डॉ. मोहन सुखटणकर, डॉ. सुधाकर लावंड म्हणाले, ज्या काळात वैद्यकीय व्यावसायिकांना बँका कर्ज देत नव्हत्या, त्यावेळी धन्वंतरी पतसंस्थेने कित्येक वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे आज ते आर्थिक दृष्ट्या सक्षम झाले आहेत. आज धन्वंतरी पतसंस्था यशाच्या शिखरावर आहे त्याचे श्रेय संस्थेचे चेअरमन डॉ. रवींद्र भोसले यांनी सभासदांना दिले.
परंतु आज वैद्यकीय व्यावसायिक जे आपापल्या क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत त्यामागे धन्वंतरी पतसंस्था आहे. सुरुवातीस लहान जागेत सुरु झालेली पतसंस्था ही आज महाराष्ट्रात आदर्श पतसंस्था असल्याचे कौतुक असून आम्ही सदर पतसंस्थेचा सभासद असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही संस्थेचे स्थापनेपासून पतसंस्थेबरोबर असून पतसंस्थेची होणारी प्रगती पाहिली आहे व आपली पतसंस्था राज्यात उत्तम व आदर्श पतसंस्था असल्याचा आम्हास अभिमान आहे. जुन्या सेवकांनी पतसंस्थेस दिलेले योगदान हे नव्या सेवकांसाठी आदर्श आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार यांनी सभासदाच्या प्रत्येक घटकाचा विचार करुन त्यांना योग्य न्याय देऊन जास्तीत जास्त फायदा कसा देता येईल याबाबत संचालक मंडळ कशी काळजी घेते, याचे विश्लेषण करुन संस्थेच्या विविध ठेव, कर्ज व इतर योजनांची माहिती दिली. व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे म्हणाले, सन १६ ऑक्टोबर १९८९ मध्ये लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून त्यामध्ये आश्रयाला येणाऱ्या सर्वांना छाया देण्याचे काम पतसंस्था करीत आहे.
संस्थेच्या कामकाजात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी त्यांनी महिलांसाठी केलेल्या विविध ठेव व कर्ज योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. पतसंस्थेस सहकार भूषण हा पुरस्कार मिळाला असून सहकारातील सर्वोच्च सहकार महर्षी हा पुरस्कार मिळविण्याचा मानस यावेळी त्यांनी व्यक्त केला व प्रमुख पाहुणे, संचालक, उपस्थित सभासद व सेवक यांचे आभार मानले. संचालक डॉ. सुनील कोडगुले यांनी कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संचालक डॉ. अरविंद काळे, डॉ. शिरीष भोईटे, डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अभिजित भोसले, डॉ. जयदीप चव्हाण, डॉ. सौ. सारिका मस्कर, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. नारायण तांबे, अॅड, सूर्यकांत देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. श्रीहरि डिंगणे, साहाय्यक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अलका मुरुमकर, सभासद, व सेवक वर्ग तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी, ठेवीदार, हितचिंतक उपस्थित होते.




