श्री क्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
पार (महाबळेश्वर):ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लाभलेल्या श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) येथील आदिशक्ती श्रीरामवरदायिनी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव २०२६ यंदा रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर ते मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीरामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट पारसोंड व ग्रामस्थ मंडळ, पार यांच्या वतीने विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
आदिशक्ती श्रीरामवरदायिनीचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व
श्रीरामवरदायिनी माता ही सर्व युगांमध्ये भाविकांच्या हाकेला धावणारी आद्यशक्ती मानली जाते. कृतयुगात महिषासुरमर्दिनी, त्रेतायुगात प्रभु श्रीरामचंद्रांना वर देणारी रामवरदायिनी, द्वापारयुगात धर्मराजाला कृपाप्रसाद देणारी देवी, तर कलियुगात छत्रपती शिवाजी महाराजांना पाठीशी राहून भवानी तलवार देणारी तुळजाभवानी म्हणजेच ही रामवरदायिनी माता होय, असे वर्णन समर्थ रामदास स्वामींनी केले आहे.
उत्सवाचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
▪️रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ (प्रतिपदा – घटस्थापना):
सकाळी ६.०० वाजता श्रीरामवरदायिनी आईला जलाभिषेक, सकाळी १०.०० वाजता सनई-चौघड्यांच्या सुरांमध्ये व दिव्य मंत्रघोषात नंदादीप प्रज्वलन आणि घटस्थापना. दुपारी २ ते ४ महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता आरती, तर रात्री १०.०० वाजता ह.भ.प. बी.ए. महाराज अंबिकाभजनी मंडळ (सिद्धनाथ वाडी, वाई) यांचे भजन रंगणार आहे.
▪️सोमवार, १२ ऑक्टोबर ते गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ (द्वितीया ते पंचमी):
दररोज सकाळी ११.०० वाजता व रात्री ९.३० वाजता श्रीं ची आरती, दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत महाप्रसाद आणि रात्री १०.०० वाजता संगीत भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी (पंचमी) रात्री १०.०० वाजता विशेष कुंकूमार्चन कार्यक्रम होईल.
▪️शुक्रवार, १६ ऑक्टोबर २०२६ (षष्टी):
सकाळी ९.०० वाजता श्री महादेवाला अभिषेक, सकाळी ११.०० वाजता आरती, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता आरती व रात्री १०.०० वाजता संगीत भजन.
▪️शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ (सप्तमी):
सकाळी ११.०० वाजता आरती, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता आरती आणि रात्री १०.०० वाजता ह.भ.प. विवेक महाराज कोंढरे (कोंढूर, ता. मुळशी) यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
▪️रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ (महाअष्टमी):
सकाळी ८ ते ११ वाजता सर्व देवदेवतांना अभिषेक, सकाळी ११.०० वाजता आरती, दुपारी १२.०० वाजता गोंधळ, दुपारी १.३० ते ३.०० महाप्रसाद, दुपारी २.०० वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, रात्री ९.३० वाजता आरती व रात्री १०.०० वाजता संगीत भजन.
▪️*सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ (महानवमी):*
सकाळी ११.३० वाजता घट हलविणे, श्रीं ची आरती व होमाची पूर्णाहूती. दुपारी १२ ते ३ महाप्रसाद, रात्री ९.३० वाजता आरती व रात्री १०.०० वाजता भजन.
▪️मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ (विजयादशमी – दसरा):
सकाळी ११.०० वाजता आरती, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद. सायंकाळी ४.०० वाजता आरतीनंतर सायंकाळी ५.०० वाजता सिमेवर पालखी मिरवणूक निघेल. सायं. ६.०० वाजता शमीपूजन व सिमोल्लंघन होईल. रात्री ७.०० वाजता पालखीचे मंदिरात आगमन होऊन एकमेकांना सोनेरुपी शमीपत्रे अर्पण करून उत्सवाची सांगता होईल.
विशेष आकर्षण व उपक्रम:
▪️भव्य लकी ड्रॉ (MEGA DRAW):* मातेला परिधान केलेल्या पैठणी साड्या मिळवण्याची सुवर्णसंधी भाविकांना मिळणार असून, या भव्य लकी ड्रॉच्या अधिक माहितीसाठी देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधावा.
▪️महिलांसाठी पारायण:उत्सव काळात महिला वर्गाकडून श्री दुर्गासप्तशती पोथीची संस्कृत व प्राकृत भाषेत पारायणे केली जाणार आहेत.
भाविकांना नम्र आवाहन:
श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथील श्रीरामवरदायिनी देवस्थान ट्रस्ट व समस्त पार ग्रामस्थ मंडळाच्या वतीने सर्व भाविकांना या मंगलमय नवरात्रोत्सवात व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टीप व संपर्क:
नवरात्रोत्सवा दरम्यान कोणत्याही धार्मिक विधी किंवा कार्यक्रमासाठी देवस्थान ट्रस्टची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. कार्यक्रमात फेरबदल करण्याचे सर्व अधिकार ट्रस्टकडे राखीव आहेत.
संपर्क:
▪️श्री. नितीन व. सोंडकर : ९४२००६०३००
▪️श्री. दिलीप स. सोंडकर : ९४०४२९७११६



