पाचगणीकरांचा संताप अनावर! वारंवार वीज खंडित; महावितरणला ग्राहक कल्याण फाउंडेशनचा ‘अल्टिमेटम’
पाचगणी प्रतिनिधी : पाचगणी शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. सणासुदीच्या काळातही वीज येताच काही वेळातच खंडित होत असल्याने व्यवसायावर परिणाम होत असून, घरातील विद्युत उपकरणेही बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. या समस्येकडे महावितरणच्या कार्यालयाकडून गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप ग्राहक कल्याण फाउंडेशनने केला आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणच्या कार्यालयातील तसेच वायरमन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पाचगणी शहरातील वीजपुरवठा सुरळीत करून वारंवार होणारा वीजेचा लपंडाव तातडीने थांबवावा, अशी मागणी फाउंडेशनने केली आहे.
यासंदर्भात ग्राहक कल्याण फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्हाध्यक्ष प्रमोद माने, समाजसेवक जी. के. अंब्राळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक राजपुरे,वामनराव खुडे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जी. व्ही. भोसले यांना निवेदन दिले.
दरम्यान, पाचगणी शहरातील वीजपुरवठ्यात लवकरात लवकर सुरळीतपणा न आल्यास ग्राहक व फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.





