जि. प. प्राथमिक आदर्श शाळा रांजणीत शालेय साहित्य वाटपाचा उत्साहवर्धक सोहळा
दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना भेट, मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला रंगत
रांजणी (ता. जावळी) :जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा, रांजणी येथे सोमवार, दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी शालेय साहित्य वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. श्री. नितीन गणपत वन्ने सातारा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल व सौ. आशाताई नितीन वन्ने समाज सेविका या दानशूर दाम्पत्याकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट देण्यात आले. नवीन साहित्य हातात पडताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद लक्षवेधी ठरला.
कार्यक्रमाला सरपंच सौ. मंदा रांजणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. जयश्री शैलेश रांजणे, उपाध्यक्ष श्री. किरण जंगम, शिक्षण तज्ज्ञ श्री. संतोष रांजणे, ग्रामस्थ श्री. विजय जाधव व सौ. सुशीला रांजणे हे मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय धुमाळ, श्री. अभिजित ननावरे सातारा जिल्हाध्यक्ष झोपडपट्टी सुरक्षा दल,श्री संजय वन्ने,श्री.पिंकेश सपकाळ,श्री. राहुल वन्ने,श्रीम. यादव मॅडम, सौ.जयमाला सं. वन्ने ,श्री. पठाण सर आणि श्री. कसबे सर, सागर मोरे यांच्यासह शिक्षकवृंदही उपस्थित होता.
सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे व दानशूर दाम्पत्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या व इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त आणि जिद्दीने शिक्षण घेण्याचे आवाहन केले. शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती सदैव सहकार्य करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
वन्ने दाम्पत्याच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. गावकरी, पालक आणि शाळा यांच्यातील सहकार्याचे सुंदर चित्र या उपक्रमातून पाहायला मिळाले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय धुमाळ व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.



