जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम
जलप्रवाह सुरळीत होण्यासह पाण्याची बचत; शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळण्यास मदत
सातारा दि ९ : जलसेवा संकल्प अभियानांतर्गत जलसंपदा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विविध कालवे, धरण परिसर आणि सिंचन प्रकल्पांच्या ठिकाणी झाडे-झुडपे काढण्यासाठी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. उपविभागीय कार्यालये तसेच शाखा कार्यालयांतील जलसंपदा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होत स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
या मोहिमेअंतर्गत नेर मध्यम प्रकल्पांतर्गत येरळा उजवा कालवा, ता. खटाव आणि हिवरे लघु पाटबंधारे प्रकल्प, ता. कोरेगाव येथे स्वच्छता करण्यात आली. तसेच उरमोडी उपसा सिंचन योजनेच्या वाठार (किरोली), ता. कोरेगाव येथील पंपहाऊस टप्पा क्रमांक १ परिसरातही झाडे-झुडपे काढण्यात आली.
पुनर्वसित गावठाण भांबे (वडगाव-उंब्रज) परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. धोम धरण परिसर, धोम उजवा कालवा तसेच सरताळे, महामुलकरवाडी, म्हसवे आणि एकंबे परिसरात स्वच्छता करण्यात आली. याशिवाय कण्हेर धरण परिसरातही श्रमदानातून झाडे-झुडपे काढण्यात आली.
धोम-बलकवडी उजवा कालवा, मौजे गिरवी, विंचुर्णी-गिरवी वितरिका आणि तिटेघर, ता. वाई येथेही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
कालवे आणि धरण परिसरातील वाढलेली झाडे-झुडपे काढल्यामुळे पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होणार आहे. परिणामी, कालव्यांची पाणीवहन क्षमता वाढण्यासह पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होईल. तसेच झाडे-झुडपांची अनिर्बंध वाढ रोखण्यासही या मोहिमेचा उपयोग होणार आहे.
रब्बी हंगामातील आवर्तनादरम्यान पाण्याचा अपव्यय टाळून शेतकऱ्यांना पाणी सुरळीतपणे उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा महत्त्वाचा उद्देश आहे. कालव्यांमधून पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि कार्यक्षम वहन झाल्यास पाण्याची बचत होऊन उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास मदत होणार आहे.



