चिंधवलीला पूर्णवेळ ग्रामपंचायत अधिकारी द्या; अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा ग्रामस्थांचा इशारा
वाई : मौजे चिंधवली गावाला पूर्णवेळ ग्रामपंचायत अधिकारी मिळावा, या मागणीसाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पंचायत समिती प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. मागणीची तातडीने पूर्तता न झाल्यास दि. 18 ऑक्टोबर 2026 पासून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे.
चिंधवली ग्रामपंचायतीसाठी श्री. ब्रम्हेंद्र जंगम यांची ग्रामपंचायत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाच्या आदेशानुसार त्यांची प्रतिनियुक्ती जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद सातारा येथे करण्यात आली. त्यानंतर चिंधवलीचा अतिरिक्त कार्यभार श्री. शहाजी बोभाटे यांच्याकडे देण्यात आला आहे.
बोभाटे यांच्याकडे त्यांच्या मूळ सजातील आसरे गावासह चिंधवली व देगाव या गावांचाही अतिरिक्त कार्यभार असल्याने तीन गावांचा कारभार पाहताना चिंधवली ग्रामपंचायतीला पुरेसा वेळ मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामकाजासह विविध शासकीय कामांसाठी ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वीही जिल्हा परिषद प्रशासन व पंचायत समिती प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून पूर्णवेळ ग्रामपंचायत अधिकारी देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
श्री. ब्रम्हेंद्र जंगम यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना चिंधवली ग्रामपंचायतीचा कार्यभार द्यावा किंवा चिंधवलीसाठी स्वतंत्र पूर्णवेळ ग्रामपंचायत अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मागणीची पूर्तता न झाल्यास दि. 18 ऑक्टोबरपासून ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून त्यानंतर संबंधित कार्यालयाकडे चावी सुपूर्द करण्याचा इशारा ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनामुळे गावाचे कोणतेही नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.




