सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » कराडच्या विश्रामगृहातील नाना पाटेकर यांची अविस्मरणीय भेट

कराडच्या विश्रामगृहातील नाना पाटेकर यांची अविस्मरणीय भेट

कराडच्या विश्रामगृहातील नाना पाटेकर यांची अविस्मरणीय भेट

असंच एका सायंकाळी कराडच्या शासकीय विश्रामगृहात मी आणि माझा परममित्र विश्वास शिंदे गप्पा मारत बसलो होतो. गप्पा रंगात आल्या असतानाच बाहेर काही जणांच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला. विश्रामगृहातील निकम याला बोलावून, “बाहेर कोण आहेत?” असे विचारले.

“काही लोक आहेत. बोलत उभे आहेत,” निकमने सहज सांगितले.

“काय विशेष?” मी विचारले.

“नाना पाटेकर येणार आहेत म्हणून आलेत,” असे उत्तर मिळाले.

हे ऐकताच मी आणि विश्वास एकमेकांकडे पाहिले. कराडच्या शासकीय विश्रामगृहात अचानक नाना पाटेकर कशासाठी येणार? हा प्रश्न दोघांच्याही मनात आला.

बाहेर उभ्या असलेल्या लोकांशी बोलण्यासाठी मी बाहेर आलो. त्यामध्ये थोरात नावाचा कराडमधील एक तरुण होता. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या संपर्कात असलेला म्हणून त्याची ओळख होती. “कोण येणार आहे?” असा प्रश्न त्याला केला; मात्र त्याने काहीसे आडेवेडे घेत उत्तर देण्यास सुरुवात केली. त्याच्याशी फारसे बोलण्यात अर्थ नाही, असे लक्षात आल्याने मी पुन्हा विश्वासकडे परतलो.

“नाना पाटेकर येणार आहेत. आले की आपण दोघे मिळून त्यांना भेटू,” असे मी विश्वासला सांगितले.

विश्वासनेही लगेच होकार दिला आणि आमच्या गप्पा पुन्हा सुरू झाल्या.

काही वेळाने गाडी येण्याचा आवाज झाला. आम्ही दोघेही विश्रामगृहाच्या दालनातून बाहेर आलो. नव्याने उभारलेल्या एका कक्षाशेजारी गाडी येऊन थांबली. गाडीतून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे उतरले.

त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या व्यक्तींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. त्याच क्षणी मी पुढे होत, “नमस्कार नाना,” असे म्हटले.

क्षणभरही औपचारिकता न ठेवता नाना जणू आमची जुनीच ओळख असल्याप्रमाणे माझ्याशी हस्तांदोलन करीत बोलले. त्यांच्या त्या सहज वागण्याने आम्हा दोघांनाही विलक्षण आपलेपणा जाणवला. त्यानंतर मी आणि विश्वासने नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे स्वागत केले. छायाचित्र काढले. “कराडमध्ये स्वागत आहे,” असे म्हणत आम्ही त्यांना कक्षापर्यंत सोडले.

नाना, मकरंद अनासपुरे, थोरात आणि इतर सहकारी कक्षात गेल्यानंतर त्यांच्या नियोजित कार्यक्रमाला सुरुवात झाली. आम्ही मात्र नाना पाटेकर यांना भेटल्याचा आनंद मनात साठवत नेहमीप्रमाणे जेवणासाठी बाहेर पडलो.

आज विचार केला तर या भेटीत असे विशेष काय होते, असे कुणी विचारेल. पण हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने, खणखणीत आवाजाने आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाने अधिराज्य गाजविणाऱ्या नानांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद वेगळाच होता. अभिनयाच्या पलीकडे जाऊन सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेले काम पाहता त्यांच्या भेटीचे मोल आणखी वाढते.

आज हे सगळे आठवण्याचे कारणही तसेच आहे. नाना पाटेकर आपल्यात राहिले नाहीत, ही बातमी ऐकून मन सुन्न झाले. एवढा मोठा कलावंत असा अचानक निघून जाईल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण बातमी खरी होती आणि त्याच क्षणी कराडच्या शासकीय विश्रामगृहातील ती भेट डोळ्यांसमोर उभी राहिली.

आज सकाळी नेहमीपेक्षा लवकर माझा परममित्र विश्वास शिंदेचा फोन आला. त्याने नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी सांगितली आणि लगेचच, “आपण कराडमध्ये नानांना भेटलो होतो,” अशी आठवण करून दिली. नाना माझ्याशी ज्या सहजपणे बोलले होते, त्याची आठवणही त्याने करून दिली.

“अरे, तुम्ही दोघे जुने ओळखीचे असल्यासारखे नाना तुझ्याशी बोलत होते,” विश्वासचे ते शब्द पुन्हा कानात घुमले.

नाना पाटेकर यांच्या नावापुढे कितीही विशेषणे लावली, कितीही पदनामे सांगितली, तरी आज त्यापेक्षा एकच गोष्ट मनाला अधिक बोचते नाना, आज तुम्ही आमच्यात नाही.

इतक्या लवकर जायला नको होते. जाण्याची खरंच एवढी घाई का केलीत?

कराडच्या त्या विश्रामगृहातील भेट आता आठवण झाली आहे. त्या भेटीतला नानांचा आपलेपणा मात्र मनात कायम जिवंत राहील.

नाना पाटेकर यांना अंतःकरणपूर्वक भावपूर्ण आदरांजली!

गोरख तावरे,

ज्येष्ठ पत्रकार, कराड, 

9326711721

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket