सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी श्रीक्षेत्र पार्वतीपूर पार येथे शारदीय नवरात्रोत्सव २०२६ चा उत्साह; ११ ऑक्टोबरपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन जलसेवा संकल्प अभियानांतर्गत कालवे व धरण परिसरात स्वच्छता मोहीम साताऱ्यात पहिल्यांदाच एअर शोचे आयोजन पुणे विभाग पदवीधर आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक संपन्न पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसंदर्भातील तक्रारी १९५० वर नोंदवा; सहायक निवडणूक अधिकारी यांचे आवाहन
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अपयश पचविणाऱ्यांनीच जगाला नवे विज्ञान दिले – सुनील शिखरे

अपयश पचविणाऱ्यांनीच जगाला नवे विज्ञान दिले – सुनील शिखरे

अपयश पचविणाऱ्यांनीच जगाला नवे विज्ञान दिले – सुनील शिखरे

साताऱ्यात जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद; नवोदय विद्यालयाचा झेंडा

सातारा (शिवाप्पा पाटील ): येथील रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान व गणित प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२६-२७ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला आणि स्पर्धात्मक वृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय, खावली (क्षेत्र माहुली, सातारा) संघाने प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले, तर आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. प्रथम विजेता ठरलेल्या संघात काव्या अतुल इंदलकर, अक्षरा संतोष रेवते आणि श्लोक आशिष कांडले यांचा समावेश होता. द्वितीय क्रमांक पटकावलेल्या संघासाठी सोहम बाबासाहेब कांगुणे, पूर्वा कमलाकर वाघ आणि श्रीयशी मयुरेश कोळे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे गतवर्षीच्या स्पर्धेतही याच दोन संघांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला होता. यंदाही या विद्यालयांनी अंतिम फेरीत उल्लेखनीय कामगिरी करून आपली गुणवत्ता पुन्हा एकवार सिद्ध केली आहे. साताऱ्याच्या आण्णासाहेब कल्याणी विद्यालयास तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

    गेली तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या ज्ञानवर्धक स्पर्धेचे बक्षीस वितरण गुरुवार (ता. ८) रोजी समारंभपूर्वक घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सातारा जिल्हा परिषदेच्या वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक सुनील शिखरे यांनी वरील उद्गार काढले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे होते.

    प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुनील शिखरे म्हणाले की, बक्षीस मिळाले नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याने निराश होऊ नये. कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. अनेक जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांनाही अपयशाचा सामना करावा लागला आणि त्यातूनच त्यांनी मोठे यश मिळविले. मानव आणि मानवेतर प्राणी यांच्यातील महत्त्वाचा फरक म्हणजे जिज्ञासा, असे स्पष्ट करून त्यांनी विद्यार्थ्यांनी सतत प्रश्न विचारत राहावे, शोधक वृत्ती जोपासावी, असे आवाहन केले. मानवी मेंदूचा विकास होत असताना परिस्थितीनुसार माणूस चांगले-वाईट ठरवत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या विचारशक्तीचा सकारात्मक वापर करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचे व सहभागी संघांचे अभिनंदन करून रयत शिक्षण संस्थेसारख्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून, शिक्षक प्रामाणिकपणे कर्तव्य करीत असल्याचा उल्लेखही श्री. शिखरे यांनी केला.

    स्वागत व प्रास्ताविक सहायक पर्यवेक्षक एन. ए. पाटील यांनी केले. तर्कशुद्ध विचार करणे आणि नवनिर्मितीची दृष्टी विकसित करणे यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे सौ. पाटील यांनी प्रतिपादन केले. यावेळी सहायक पर्यवेक्षक रवींद्र खोत, व्ही. जी. मोहिते व सर्व विभाग प्रमुखांची व्यासपीठावर उपस्थिती होती. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून काव्या इंदलकर व सोहम कांगुणे यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून सुमेधा कुलकर्णी यांनी विचार मांडले.

    प्राचार्य वंदना नलवडे यांनी यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सने विज्ञान शिक्षणाची परंपरा व वारसा समर्थपणे जपल्याचे सांगितले. भविष्यातील संशोधक आणि विज्ञान शिक्षकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला नाही, तर केवळ विज्ञानाचे शिक्षण घेण्याला अर्थ उरणार नाही. विद्यार्थ्यांनी चौकस, जिज्ञासू आणि प्रश्न विचारणारे असले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. विज्ञान क्षेत्रात कुतूहल, एकाग्रता, नाविन्यपूर्ण विचार, कल्पकता, भावनिक बुद्धिमत्ता आणि सहनशीलता यांना मोठे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि भावनिकदृष्ट्या सक्षम असणे हे आजच्या काळात तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात करिअरची सुरुवात केली तरी विज्ञानाचा हात धरून काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

    अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी प्रश्नमंजुषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आज येथे उपस्थित असलेले विद्यार्थी हे सातारा जिल्ह्यातील गुणवत्तेचे प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा सकारात्मक व विधायक वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. सेमिकंडक्टर, क्वांटम सायन्स आणि जेनेटिक्स यांसारख्या आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रांमध्ये संशोधनाच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचेही डॉ. साळुंखे यांनी सांगितले. “यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेणे म्हणजे जागतिक संधींचे दार उघडणे होय,” असे सांगत विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरच्या दृष्टीने ‘वायसीआयएस’मध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन प्राचार्य श्री. साळुंखे यांनी केले.

     स्पर्धेत गुणानुक्रमे पुढील विद्यालयांनी उल्लेखनीय कामगिरी केली. चौथा क्रमांक – महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा; पाचवा क्रमांक – न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, हुमगाव; सहावा क्रमांक – साधना इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा आणि सातवा क्रमांक – मोना स्कूल, सातारा. स्पर्धेत आण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या आर्या सचिन थोरवे व दिशा दिनेश ढेरे, मोना स्कूलच्या मुग्धा शेखर वाघ, यशवंत हायस्कूल, कराडचे अथर्व हणमंत पाटील व शौर्य विजय पोरडे, तसेच साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या सिद्धी अमोल येवले यांनी उल्लेखनीय सहभाग नोंदविला. न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, हुमगाव येथील श्रेयश सागर गुरव तसेच महाराजा सयाजीराव विद्यालय, सातारा येथील स्वराली संदीप जाधव व श्रीराम दशरथ कुराडे यांनीही आपल्या गटातील सहकाऱ्यांसोबत उत्कृष्ट उत्तरे देत परीक्षकांची वाहवा मिळविली. स्पर्धेत बक्षीसपात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

उपप्राचार्य नंदिनी साळुंखे, पर्यवेक्षक एन. टी. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एम. एन. पवार यांनी स्पर्धेचे अचूक नियोजन केले. परीक्षक म्हणून ए. ल. ढेबे, ए. बी. गाढवे, ए. एन. वरेकर, एस. व्ही. सूर्यवंशी, एस. पी. पोपळकर यांनी काम पाहिले. जी. एन. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. ए. पी. कुलकर्णी यांनी आभार मानले. बी. ओ. नामजोशी, डी. बी. डुरे, श्वेता निकम, कोमल जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पुढाकार घेतला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

सातारा जिल्हा सब-ज्युनियर फुटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन CBSE च्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी पाचगणी : सातारा जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित

Live Cricket