पाचगणी पोलीस ठाण्यात सर्वोत्कृष्ट पुरस्कार
वाई प्रतिनिधी -पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार व त्यांच्या पथकाला चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत सर्वोत्कृष्ट पुरस्कार पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आंचल दलाल, वाई उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी पाचगणी पोलिस ठाण्याचा कार्यभार स्वीकारल्यापासून दाखल गुन्ह्यांपैकी अनेक गुन्हे उघडकीस आणले. यात गुन्हे प्रकटीकरण टीम, बीट अंमलदार यांनी कामगिरी पार पाडली आणि लंपास केलेली मालमत्ता हस्तगत केली. त्यातील काही मालमत्ता न्यायालयीन प्रक्रियेनंतर तक्रारदारांच्या स्वाधीनही केली. अनेक चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून त्यात चोरीला गेलेला माल हस्तगत करण्यात आघाडी घेत संपूर्ण जिल्ह्यात सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
या कामगिरीची दखल घेत पाचगणी पोलिस ठाण्याचे सहायकपोलिस निरीक्षक दिलीप पवार, पोलिस नाईक श्रीकांत कांबळे, तानाजी शिंदे, पोलिस हवालदार उमेश लोखंडे यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.