युवा नेतृत्व ठरले निर्णायक; संजय गायकवाड व राजेंद्र राजपुरे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी यशस्वी
महाबळेश्वर –पाचगणी नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीचा विजय; संजय गायकवाड व राजेंद्र राजपुरे यांचे नियोजनबद्ध नेतृत्व ठरले निर्णायक
महाबळेश्वर (अली मुजावर )महाबळेश्वर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद व पाचगणी गिरिस्थान नगरपरिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला भरघोस यश मिळाले आहे. या यशामागे मंत्री मकरंद आबा पाटील यांचे विश्वासू सहकारी संजय गायकवाड आणि राजेंद्र शेठ राजपुरे यांचे नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण कार्य निर्णायक ठरले.
मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत संजय गायकवाड व राजेंद्र शेठ राजपुरे यांनी स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्याचा थेट फायदा या नगरपालिकांच्या निवडणुकांत दिसून आला असून, दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.
तालुक्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय भूमिका बजावत, शांत व संयमी नेतृत्व असलेल्या संजय गायकवाड आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र शेठ राजपुरे यांनी तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना एकत्र बांधत राष्ट्रवादीची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवली. संघटनात्मक बांधणी, कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि विकासाभिमुख राजकारण यामुळे राष्ट्रवादीला जनतेचा विश्वास मिळाल्याचे चित्र दिसून आले.
या यशामुळे महाबळेश्वर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची राजकीय ताकद अधिक भक्कम झाली असून, आगामी काळात तालुक्याच्या विकासासाठी सकारात्मक आणि निर्णायक भूमिका बजावली जाईल, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.




