यशोदा ऑफ इन्स्टिट्यूट चा प्रवास विलक्षण प्रेरणा देणारा: अविनाश धर्माधिकारी
यशोदा शिक्षण संकुलाचा १७ वा वर्धापन दिन समारंभ भव्य उत्साहात साजरा
सातारा : ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत कार्यरत असलेल्या यशोदा शिक्षण संकुलाचा १७ वा वर्धापन दिन समारंभ भव्य उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या सोहळ्यास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. समारंभाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करून कार्यक्रमाला विशेष तेज दिले.
समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात समाजप्रबोधनकार, निवृत्त आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी ‘उद्याच्या भारत देशासाठी शिक्षकांची कर्तव्ये’ या विषयावर उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारे विचार मांडले. त्यांनी आजच्या काळातील शिक्षकांनी बदलत्या शैक्षणिक पद्धतींसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी नव्या दृष्टीकोनाने कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रभावी आणि प्रेरणादायी भाषणाने संपूर्ण प्रेक्षागृह दणाणून गेले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी या सोहळ्यासाठी विशेष उपस्थित राहून प्रा. दशरथ सगरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी यशोदा शिक्षण संकुलाच्या कार्याची स्तुती करताना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी संस्थेने केलेले योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले. तसेच वर्धापन दिनाचा उत्सव अधिक उत्साहात आणि स्नेहभावनेत साजरा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत पुरवण्यात आली. अतुल माळी यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय बॅगा देण्यात आल्या तर संजय शेलार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे वर्धापन दिनाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली.
समारंभाला उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये शिवकृपा परिवाराचे मा. चंद्रकांत वंजारी, यशोदा इन्स्टिट्यूटच्या सल्लागार समितीचे सदस्य उद्योजक संजय मोरे, मुख्याध्यापक संजय कदम,रणजीतभाऊ घाडगे,रणजीत साळुंखे, पानगावचे. राम गुरुजी, बब्रुवान सगरे,सरपंच सदानंद गाडे, पिंटू नाईकवडी, चार्टर्ड अकाउंटंट राजेश कासार, मा. राजेश वंजारी यांसह विविध मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष दिमाख प्राप्त झाला.
या वर्धापन दिन सोहळ्यात यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांची ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्वागत समिती सदस्यपदी झालेल्या निवडीबद्दल गौरव करण्यात आला. तसेच विभागातील विक्रमी ऊस उत्पादनाबद्दल मा. संजयजी शेलार यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेतील विविध गुणवंतांचा विशेष गौरव करण्यात आला. वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना, पीएचडी प्राप्त शिक्षकांना, पुस्तक प्रकाशित करणाऱ्या शिक्षकांना, खेळातील प्रावीण्याबद्दल विद्यार्थ्यांना, तसेच एनबीए मानांकन मिळवणाऱ्या विभागांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या गौरव समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये नव्या उर्जेचा संचार झाला.
वर्धापन दिनानिमित्त प्रा. दशरथ सगरे यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन तसेच दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या. यामध्ये सन्माननीय मंत्री महोदय, खासदार, आमदार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता.
या सोहळ्यात प्रेरणादायी विचारमंथन, सामाजिक कार्यकर्त्यांचा सहभाग आणि गुणवंतांचा गौरव अशा त्रिसूत्रीमुळे कार्यक्रमाला एक विशेष उंची लाभली. संपूर्ण कॅम्पस उत्साह, आनंद आणि ऐक्याच्या वातावरणाने उजळून निघाला.
समारंभाच्या यशस्वी आयोजनासाठी यशोदा शिक्षण संकुलाचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांचे नेतृत्व लाभले. शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्व सहकाऱ्यांनी एकत्रितपणे परिश्रम घेत हा सोहळा संस्मरणीय केला.
उत्सवाच्या अखेरीस सर्व मान्यवरांनी संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आणखी प्रभावी शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याचा विश्वास व्यक्त केला. स्वागत प्रास्ताविक प्राध्यापक रणधीरसिंह मोहिते, पाहुण्यांची ओळख श्री संजय कदम, अहवाल वाचन कुलसचिव गणेश सुरवसे, सूत्रसंचालन प्रिया इंगवले, अमृता मोहिते, सुप्रिया भांडवलकर यांनी केले.
मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीने समारंभाला विशेष तेज प्राप्त झाले. प्रेरणादायी मार्गदर्शन, गुणवंतांचा गौरव आणि यशोदा सेवकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा दिवस अविस्मरणीय ठरला.
यशोदा शिक्षण संकुलाच्या वर्धापन दिना सोबतच दसऱ्याचा दिवस म्हणजे प्रा. दशरथ सगरे यांचा जन्मदिवस पण निसर्गाच्या अवकृपेने निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे हजारो कुटुंबांना संसार उपयोगी साहित्याचा त्याग करावा लागला याच भावनेने वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. या कृतीबद्दल अविनाश धर्माधिकारी यांनी प्रा. सगरे यांना संवेदनशील मन जोपासल्याबद्दल धन्यवाद देखील दिले. दरम्यान त्यांनी केलेल्या आवाहनानंतर पूरग्रस्तांसाठी यशोदा इन्स्टिट्यूटच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये भरीव मदत करण्यात येणार आहे.
