यशेंद्र क्षीरसागर यांना सातारा प्राईड पुरस्कार प्रदान!
सातारा, दिनांक 23: विविध क्षेत्रात आपल्या सर्जनशील कर्तृत्वाने आणि कल्पक कृतीने आपल्या नावाची छाप उमटवून साताऱ्याला कर्तृत्वाच्या क्षितिजावर वेगळी झळाळी प्राप्त करून देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार ‘सातारा न्यूज मीडिया सेवन’ तर्फे दिमाखात करण्यात आला. यामध्ये कवी, साहित्यिक, प्रसिद्ध वक्ते कोरेगाव पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांचा “सातारा प्राइड २०२४ “पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी किरण यादव अध्यक्ष प्राथमिक शिक्षक सहकारी बँक, उद्योजक वसंतशेठ जोशी , श्रीरंग काटेकर,बाळासाहेब जगदाळे, संतोष जाधव, ,सागर भोसले,पत्रकार, मोठ्या प्रमाणावर नागरिक मान्यवर उपस्थित होते. श्री. क्षीरसागर यांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. गरीब मुलांना ते मोफत अध्यापन करतात. सलग २५ तास अध्यापन करण्याचा त्यांनी विश्वविक्रम केला आहे .३०६८ ओळींची सर्वात मोठी कविता लिहून लिमका बुक मध्ये विक्रम नोंदविला आहे .शेकडो व्याख्याने ते विविध घटकांसमोर देऊन सातत्याने प्रबोधन करीत असतात .त्यांची भारतीय संस्कृती, मनातली वादळे आणि विचारांचे चांदणे अशी तीन पुस्तके प्रसिद्ध आहेत. कविता, लेख याद्वारे ते सामाजिक घडामोडींवर भाष्य करीत असतात. प्रभाकर सामान्यज्ञान दिनदर्शिका हा नावीन्यपूर्ण उपक्रम खास विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सुरू केला असून तो महाराष्ट्रातील पहिलाच आहे. संत साहित्याचे ते अभ्यासक असून शासकीय अधिकारी म्हणून काम करत असतानाच कोरोना नियंत्रण कक्ष, निवडणूक अधिकारी या नात्याने देखील त्यांनी भरीव काम केले असून संबंधित अधिकाऱ्यांकडून ते प्रशंसेस पात्र ठरले आहेत. हा सर्व विचार करून त्यांची सातारा प्राईड पुरस्काराची निवड करण्यात आली असे संयोजकांनी सांगितले .यावेळी प्रभा भोसले, अनिरुद्ध जगताप, श्रीकांत देशमुख, किरण बाबर, अमर कोल्हापुरे ,राजेंद्र घुले यांचा देखील सत्कार करण्यात आला. “मानवता, आपुलकी अशा मानवी मूल्यांचा प्रसार भौतिक प्रगती सोबतच नवनिर्मित भारतासाठी आवश्यक आहे. ज्याला आयुष्यात काही मिळाले आहे, त्यांनी ते समाजाला देण्याचा प्रयत्न करावा .संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांची शिकवण कायम लक्षात ठेवावी”, असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना श्री.क्षीरसागर यांनी केले!