वाई अर्बन बँकेची सभा खेळीमेळीत
वाई, दि. 21- बँकेचा नक्त एनपीए 6% पेक्षा कमी करणे, त्यासाठी आवश्यक तेथे कायदेशीर व सनदशीर मार्गाने थकीत कर्ज वसुली करणे, कर्मचाऱ्यांनी आजवर केलेल्या कामाचा उचित गौरव करणे आणि आगामी काळात बँकेला सर्वच बाबींमध्ये ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणे यासारख्या विविध विषयांवर चर्चा करीत वाई अर्बन बँकेची 104 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी वाईतील साठे मंगल कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
अध्यक्षीय मनोगतात बँकेचे अध्यक्ष अनिल देव म्हणाले, गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये सातत्यपूर्ण प्रयत्न करून बँकेचा नक्त एनपीए 8.71% पर्यंत कमी करण्यात संचालक मंडळाला यश आले आहे. अद्यापही 136 कोटी रुपयांची एनपीए खाती वसूल करणे हे बँकेचे आगामी काळातील आव्हान आहे. काही खात्यांमध्ये काही चुकीच्या खातेदारांनी कर्ज उचलून त्याची व्यवस्थित परतफेड केली नसल्याने बँकेला गेल्या दोन-तीन वर्षात तोटा सहन करावा लागला. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बँकेने चार कोटी 56 लाख रुपये नक्त नफा मिळवला आहे. मात्र मागील चार-पाच वर्षातील सुमारे 59 कोटी रुपयांचा तोटा भरून काढणे, हे बँकेपुढे मोठे आव्हान होते. ते काही प्रमाणात कमी करण्यात बँकेला यश आले आहे. रिझर्व बँकेच्या नियमांमध्ये राहून नवीन कर्ज दिलेली आहेत. एप्रिल 2024 मध्ये नव्याने कर्ज वाटप सुरू झाल्यानंतर बँकेने रुपये 140 कोटी कर्ज वितरण केले आहे व त्यामधील एकही खाते एनपीए झालेले नाही. सातत्याने कर्मचारी वर्गाचे हिताचा निर्णय घेतलेला आहे.
बँकेचे संचालक विवेक पटवर्धन म्हणाले, अनेक थकीत कर्ज खात्यांमध्ये वसुली करताना अनेक अडचणी येत आहेत. काही कर्जदारांना वारंवार कर्ज दिली गेल्यामुळे त्यांची व्याज रक्कम वाढल्याने बँकेला दिलेले तारणाची किंमत कमी होत आहे. अशा प्रकरणांमध्ये कर्ज वसुली करताना अडचणी येत आहेत. तारणाचे मूल्य कमी झाल्यामुळे भविष्यकाळात काही खात्यांची वसुली करणे अडचणीचे होत आहे. जी चुकीची कर्ज दिली गेली, त्याला जबाबदार असणारे सर्व संबंधि़ांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. भविष्यकाळातही सर्व व्यापारी बंधू व खातेदारांनी आपल्या बँकेच्या विविध ठेव व कर्ज योजनांचा फायदा घेऊन आपल्या बँकेला ऊर्जितावस्था प्राप्त करून द्यावी. सामान्य कर्ज सोडून सर्व प्रकारची तारणी कर्जे बँकेने दिली असून मागील वर्षभर असलेली 25 लाख रुपयांची कर्ज मर्यादा RBI ने जुलै 2025 पासून काढून टाकली आहे. त्यानंतर बँकेने सुमारे 17 कोटी रुपयांचा तारणी कर्जपुरवठा केलेला आहे
मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले व सभासदांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. आगामी काळात दैनंदिन ठेव प्रतिनिधींना मोबाईल द्वारे कलेक्शन करण्याची सुविधा देण्यात येणार आहे, असे सांगितले.
दीप प्रज्वलन व श्री महागणपती, श्रीकृष्णामाई प्रतिमा पूजनाने सभेला सुरुवात झाली. श्री चंद्रशेखर काळे यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती बद्दल बँकेचे अध्यक्ष अनिल देव यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संचालक प्रीतम भुतकर यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. उपाध्यक्ष डॉ शेखर कांबळे यांनी आभार मानले. सहायक सरव्यवस्थापक प्रसाद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सहायक सरव्यवस्थापक आनंद पटवर्धन यांनी मागील वर्षीचे इतिवृत्त वाचून दाखवले. सभेत बँकेचे माजी अध्यक्ष डॉ. मधुसूदन मुजुमदार, सतीश शेंडे, सीए. चंद्रकांत काळे, माजी संचालक मिलिंद भंडारे, सौ. गीता कोठावळे, सभासद राजाभाऊ खरात, प्रदीप चोरगे, मिलिंद पाटणकर, नंदकुमार ढगे, संतोष पिसाळ, सुधाकर कांबळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन फरांदे, दिपक सपकाळ, रवींद्र पिसाळ आदींनी सूचना केल्या व काही प्रश्न उपस्थित केले. त्यास बँकेचे संचालक माधव कान्हेरे, मकरंद मुळये, सीइओ काळे यांनी उत्तरे दिली. सौ मनीषा घैसास यांच्या संपूर्ण वंदेमातरम ने सभेची सांगता झाली. सभेस माजी अध्यक्ष अरुण देव, कांतीलाल ओसवाल, माजी उपाध्यक्ष सुनील शिंदे,अॅड . प्रभाकर सोनपाटकी, राजेंद्र चावलानी माजी संचालक विद्याधर तावरे, प्रा. डॉ. एकनाथ पोळ, शरद माळवदे, मनोज खटावकर, सौ अनुराधा जोशी तसेच डॉ. सुधीर बोधे, वैधानिक लेखापरीक्षक सीए. शिरीष गोडबोले, बंग, सीए गाडगीळ, संचालक रमेश ओसवाल, अॅड. बाळकृष्ण पंडित, काशिनाथ शेलार, महेश राजेमहाडिक, चंद्रकांत गुजर, स्वप्निल जाधव, संचालिका अॅड सौ. सुनीती गोवित्रीकर, सौ. ज्योती गांधी, व्यवस्थापन मंडळ सदस्य अविनाश जोशी, रामचंद्र कानडे, अनंत जोशी आदी व सभासद उपस्थित होते.
