वाई तालुक्यातील महिलांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले स्वतःच्या रक्ताने पत्र मागितला न्याय
वाई – सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चित असलेल्या वाई तालुक्यातील अवैध स्टोन क्रशर च्या विरोधात कुसगाव विठ्ठलवाडी व्याहळी, एकसर पार्टेवाडी भागातील ग्रामस्थांनी पायी चालत मंत्रालय गाठले आहे. परंतु महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कोणतेही लक्ष दिले नसून वाई तालुक्यातील महिलांनी रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्याय मिळावा यासाठी स्वतच्या रक्ताने लिहिलेले पत्र संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल होत आहे. अवैद्य क्रशर बंद करून बहिणींना न्यायची अपेक्षा फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच लागून राहिली आहे. मुख्यमंत्री याबाबत नक्की कोणती कारवाई करतात हे पाहणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुसगाव, विठ्ठलवाडी, व्याहळी, एकसर , पार्टेवाडी या भागातील महिलांनी रक्ताने पत्र लिहिले. गेली २२ दिवसांपासून या गावचे नागरीक अवैध स्टोन क्रशरच्या विरोधात आपल्या गावापासून मुंबईपर्यंत पायी चालत निघाले आहेत. या सर्वसामान्य माणसांचा आवाज जर मायबाप सरकारच्या कानावर पडत नसेल तर यासारखे दुर्दैव नाही. हे केवळ पत्र नाही तर गेल्या अनेक वर्षांचे अश्रू आहेत. या गावातील भगिनींचे अश्रू पुसून देवाभाऊ त्यांना राखी पौर्णिमेची ओवाळणी म्हणून अवैध क्रशर बंद केल्याची ऑर्डर देतील का? असा संवाद वाई तालुक्यातील जनता करत आहे.





