“नागरिकांच्या हितासाठी कधीही तडजोड करणार नाही” – कुमार शिंदे यांचा महाबळेश्वरकरांना शब्द
महाबळेश्वर, २२ (प्रतिनिधी) :महाबळेश्वर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमार शिंदे यांनी आज आपल्या प्रचाराचा शुभारंभ अत्यंत उत्साही वातावरणात केला. माजी नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे व समर्थकांची मोट बांधत त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत व्यापारी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बाजारपेठेतील दोन्ही बाजूच्या दुकानांपुढील चार फुटांची जागा वाचवण्यात कुमार शिंदे यांचे मोठे योगदान असल्याची भावना व्यापारी वर्गाने व्यक्त केली, आणि त्यांचे जोरदार स्वागत केले.
व्यापारी बांधवांकडून ‘सिंहाचा वाटा’ म्हणून गौरव
प्रचार शुभारंभ येथील टॅक्सी संघटनेच्या कार्यालयापासून दुपारी बारा वाजता करण्यात आला. शहराच्या मुख्य बाजारपेठेतून फेरफटका मारताना कुमार शिंदे यांनी व्यापारी बांधवांच्या गाठीभेटी घेतल्या आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी व्यापारी बांधवांनी स्पष्ट केले की, बाजारपेठेतील रुंदीकरणाच्या कामामुळे दुकानांपुढील चार फुटांची जागा जात होती. ही जागा वाचवण्यासाठी कुमार शिंदे यांनी ‘सिंहाचा वाटा’ उचलला. त्यांनी स्थानिकांच्या पाठीशी असेच उभे राहावे, अशी अपेक्षाही व्यापारी बांधवांनी व्यक्त केली.
‘रातोरात मुंबई गाठली आणि बाजारपेठ वाचवली’
व्यापारी बांधवांच्या प्रेमामुळे भारावून गेलेले कुमार शिंदे यांनी यावेळी नेमका काय घडले हे स्पष्ट केले. ते म्हणाले, “महाबळेश्वर बाजारपेठेतील दोन्ही बाजूची सर्व दुकाने चार फूट आत घ्यावी लागणार होती. अनेक छोटे दुकानदार यामुळे भरडले जाणार होते.”
व्यापारी मंडळींनी हे गाऱ्हाणे माझ्याकडे मांडताच, “मी क्षणाचाही विलंब न करता रातोरात मुंबई गाठली.” तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्र्यांकडून सदर निर्णयावर तात्काळ स्थगिती आणण्यात आली, आणि महाबळेश्वरची बाजारपेठ वाचली. नेत्यांचे पाठबळ आणि महाबळेश्वरकर नागरिकांचे आशीर्वाद याचमुळे हा निर्णय शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रचार शुभारंभाला मान्यवरांची उपस्थिती:
प्रचाराचा शुभारंभ करताना सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमारभाऊ शिंदे, माजी नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे यांच्यासह हेमंत साळवी, पूजा उतेकर, संगीता गोंदकर, प्रशांत आखाडे, मोज्जम नालबंद व अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधून आशीर्वाद घेतले. कुमार शिंदे यांनी नागरिकांच्या हितासाठी कधीही तडजोड केली नाही आणि करणार नाही, असा ठाम शब्द महाबळेश्वरकर जनतेला दिला.




