मतदार शशिकांत शिंदे यांना साथ देतील सौ. वैशाली शिंदे
सातारा- शशिकांत शिंदे यांनी २५ वर्षांहून अधिक काळ सामान्य जनतेसाठी झोकून देवून काम केले आहे. आपला नेता आणि पक्षाशी कायम निष्ठा ठेवणाऱ्या शशिकांत शिंदे यांची सामान्य जनतेवरही निष्ठा कायम राहिली. सामान्य जनतेचे प्रश्न पोटतिडखीने सोडवण्यात शशिकात शिंदे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. ही निवडणूक आता जनतेने हाती घेतली असल्याने मतदार शशिकांत शिंदे यांना साथ देवून मोठ्या मताधिक्क्याने विजयी करतील, असा विश्वास सौ.वैशाली शिंदे यांनी व्यक्त केला.
सातारा लाेकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ महिला आघाडीच्यावतीने सातारा शहरात ठिकठिकाणी मतदारांशी संवाद साधण्यात आला. याप्रसंगी सौ. शिंदे बोलत होत्या. यावेळी सौ. समिंद्रा जाधव, तेजस्वी केसरकर, सुषमा राजेघोरपडे प्रज्ञा गायकवाड, वैशाली जाधव, अंजली राजपूत, शैलजा कदम, सुनंदा शिवदास, नलिनी जाधव, डॉ. सुनीता शिंदे, संगीता ढाणे आदी उपस्थित होत्या.
सौ. वैशाली शिंदे म्हणाल्या, देशाचे नेते शरद पवार यांनी केलेला संघर्ष सर्वांनी पाहिला आहे. वयाच्या ८४ व्या वर्षीही हा योध्दा अतिशय ताकतीने पक्षाची मोट बांधत आहे. या संकटाच्या काळात राज्यातील जनता पवार साहेबांबरोबर असल्याचे दिसत आहे. विशेषत: युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला यांचा पवार साहेबांना पाठिंबा वाढत आहे. आ. शशिकांत शिंदे यांनी गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडवले आहे. तळागाळातील लाेकांशी त्यांची नाळ जोडली असल्याने मतदारसंघात त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी जनतेने स्वयंस्फूर्तीने प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. आता जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली असल्याचे शशिकांत शिंदे मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा विश्वास सौ. शिंदे यांनी व्यक्त केला.
सौ. समिंद्रा जाधव म्हणाल्या, आ. शशिकांत शिंदे यांना सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असून शशिकांत शिंदे यांना लाेकसभेत पाठवण्यासाठी महिला आघाडीने प्रचार मोहीम गतीने राबवण्यास सुरुवात केली आहे. काही लाेकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी पक्ष, घरे फोडली. अशा संकटाच्या काळात पवार साहेबांबरोबर राहण्याचा निर्णय ठिकठिकाणी घेतला जात आहे. सातारा लाेकसभा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने जनतेत नाराजी आहे. आ. शशिकांत शिंदे युवकांसाठी रोजगार व महिलांसाठी उद्योगधंदे निर्माण करु शकतील अशी अपेक्षा सातारा मतदारसंघातील जनतेला आहे. त्यामुळे आ. शिंदे यांच्या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांना मोठ्या संख्येने मतदान करा, असे आवाहन सौ. जाधव यांनी केले आहे. यावेळी तेजस्वी केसरकर, सुषमा राजेघोरपडे प्रज्ञा गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली – सौ.वैशाली शिंदे
आ. शशिकांत शिंदे हे संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व आहे. संपूर्ण जिल्ह्याने त्यांचा संघर्ष पाहिला आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात त्यांची वेगळी प्रतिमा आहे. विकासकामांवरुन आ. शिंदे यांच्यावर टीका करता येत नसल्याने काही लाेकांकडून तथ्यहिन आणि बिनबुडाचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने आणि शिंदे यांच्यावर बोलण्यासाठी कोणता ठोस मुद्दा नसल्याने विरोधकांकडून त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मतदारसंघातील जनता सूज्ञ असून शशिकांत शिंदे काय व्यक्तिमत्व आहे हे त्यांना माहित आहे. त्यामुळे असल्या फसव्या आरोपांना ही जनता भुलणार नाही. आता जनतेनेचे आपल्या मनामनातील खासदार म्हणून आ. शशिकांत शिंदे यांना मान्यता दिली असल्याने ते लाेकसभेत नक्की जातील, असा विश्वास सौ. वैशाली शिंदे यांनी व्यक्त केला.