वाचनाचे महत्त्व समृद्धीकडे नेणारे :- श्याम जोशी
सातारा, दि. २६ ( प्रतिनिधी):- वाचनाचे महत्त्व समृद्धीकडे नेणारे आहे, असे प्रतिपादन राज्य शासनाचा मंगेश पाडगावकर भाषा संवर्धक पुरस्कार प्राप्त व बदलापूर मधील ग्रंथसखा या वाचनालयाचे संचालक श्याम जोशी यांनी केले.
लोकमंगल हायस्कूल एम.आय.डी.सी. कोडोली, सातारा येथे मराठी राजभाषा दिनाच्या पूर्वसंध्येला साहित्यिकांची सदिच्छा भेट कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, रोहिणी जोशी,रवींद्र गुर्जर मराठी अनुवादक, अर्चना कर्णिक ग्रंथपाल, प्रा. विश्वास नेरकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती विद्या बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्याम जोशी पुढे म्हणाले, बोलायला शब्द लागतात. ते शब्द कशा पद्धतीने बोलायचे याच्यासाठी कौशल्य लागते. किती बोलायचं हे दृष्टिकोन ठरवते. संवाद साधण्यासाठी आपल्याला ज्ञान पाहिजे. चांगलं बोलणं आणि चांगलं सांगणं याला कौशल्य लागते. ज्ञान पाहिजे, सांगण्याचं कौशल्य पाहिजे, किती सांगायचं याचा दृष्टिकोन पाहिजे, जे सांगायचं ते सांगायचं की नाही सांगायचं हे जो ठरवतो ती संस्कृती असते. बोलण्याचा स्तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो. मित्र-मैत्रिणींशी ज्याप्रमाणे त्याप्रमाणे गुरुजनांशी, वडीलधाऱ्या माणसांशी आपण बोलत नाही. कारण आपली संस्कृती वर्षानुवर्ष जे आपल्याला शिकवत आलेली आहे की कसं बोलायचं, कसं सांगायचं, कसं वागायचं. पाचव्या शतकामधील अत्यंत दुर्मिळ पुस्तक वररुची या लेखकाने प्राकृत प्रकाश या नावाने लिहिलेले असून ते माझ्या ग्रंथालय मध्ये आहे. आज जी आपण मराठी भाषा बोलतो त्याला पाचव्या शतकामध्ये प्राकृत असे म्हणत असत. अप भ्रमशातून ही मराठी भाषा हळूहळू विकसित होत गेली.
शिरीष चिटणीस म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, त्यामधून तुम्ही पुढे जावे यासाठी मी साहित्यिकांना तुमच्यासमोर बोलावलेले आहे. आपल्या मनामध्ये ज्या भावना निर्माण होतात ते आपण लिहिले पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये एखादे व्याख्यान, अथवा एखादी माहिती ते आपल्या आयुष्य बदलून टाकते.
रवींद्र गुर्जर म्हणाले, मला वाचनाची लहानपणापासून खूप आवड होती. चित्रपट नाटक याची मला खूप आवड होती. मी प्रवास खूप केला. अनेक क्षेत्रांमधील माझे मित्र असल्याने मला साहित्य लेखनाला त्याचा खूप फायदा झाला. मी 35 ते 40 पुस्तके लिहिलेली आहेत. तुम्हाला कोणते पुस्तक वाचायचे यासाठी प्रथमतः तुम्ही शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या. एकदा तुम्हाला वाचण्याची गोडी लागली की पुस्तक हातातून सुटत नाही.
यावेळी संस्कृती कांबळे व समृद्धी विभुते या विद्यार्थिनींनी स्वरचित कविता सादर केली. या कार्यक्रमास काकासो निकम, संगिता कुंभार, भास्कर जाधव,यश शिलवंत, देवराम राऊत, चंद्रकांत देवगड यांची उपस्थिती होती. प्रस्ताविक शिरीषचिटणीस यांनी केले. प्रतिभा वाघमोडे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती विद्या बाबर यांनी आभार मानले.
