उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, क्षणार्धात अनेक हॉटेल आणि घरं वाहून गेली, ४ जणांचा मृत्यू
उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असून राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. दरम्यान, उत्तरकाशी जिल्ह्यातील धरालीमध्ये ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसानंतर अचानक पूर आल्यामुळे भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये क्षणार्धात अनेक हॉटेल आणि घरं वाहून गेल्याची माहिती मिळत आहे.
ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसानंतर धरालीमध्ये बचाव पथके दाखल झाली असून बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. भारतीय लष्कर, राज्य आपत्ती दलाचे जवान आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य करत आहेत. ज्या ठिकाणी ही घटना घडली, हा परिसर लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या हर्षिलपासून १० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.
तसेच भटवारीच्या उपजिल्हाधिकारी शालिनी नेगी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, या घटनेत जीवितहानी होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप आमच्याकडे सविस्तर माहिती आलेली नाही. आम्ही त्या भागात पोहोचत आहोत, असं त्यांनी सांहितलं. तसेच पोलीस सूत्रांनी सांगितलं की, या भागात पर्यटकांची संख्या कमी असली तरी ही घटना घडली तेव्हा जवळच एक स्थानिक उत्सव सुरू होता. दरम्यान, जेव्हा पूर आला तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे नुकसान झाल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
उत्तराखंडच्या धराली गावात ढगफुटी झाल्यामुळे अचानक आलेल्या पुरामुळे आणि त्यानंतर एक ढिगारा कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती सांगितली जात आहे. युद्धपातळीवर मदत कार्य सरू असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सांगितली. मुख्यमंत्री धामी यांनी म्हटलं की, “घटना घडल्यानंतर तेथील नागरिकांचं तात्काळ स्थलांतर केलं जात आहे. परिस्थितीवर सरकार लक्ष ठेऊन आहे. तसेच राज्य सरकारच्या देखरेखीखाली मदत आणि बचावकार्य सुरू आहे. लोकांना मदत करण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही”, असं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हटलं आहे.
