उत्कर्ष पतसंस्थेच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सहकार जागरूकता
वाई : उत्कर्ष पतसंस्थेच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त व जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या सभासद आणि ग्राहकांमध्ये सहकार क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका आणि फायदे याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ, आर बी आय निवृत्त अधिकारी मा श्री अविनाश जोशी यांनी सहकार चळवळीचा इतिहास, पारदर्शक व्यवस्थापन, आणि पतसंस्थांचे अर्थकारण यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व संस्थापक स्व.आनंद कोल्हापुरे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. संस्थेचे अध्यक्ष श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी उपस्थितांचे स्वागत करत उत्कर्ष पतसंस्थेच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. त्यांनी संस्थेच्या आर्थिक प्रगतीसाठी सभासदांच्या सहभागाचे महत्त्व सांगितले. संस्था स्थापनेच्या वेळेच्या जुन्या आठवणीना त्यांनी यावेळी उजाळा दिला.
त्यानंतर प्रमुख वक्ते मा श्री अविनाश जोशी यांनी सहकार क्षेत्राच्या संधी आणि आव्हाने याविषयी सविस्तर विवेचन केले. त्यांनी पतसंस्थांचे सभासद व ग्राहक यांच्यातील विश्वास आणि पारदर्शी व्यवहाराचे महत्त्व सांगितले. “सहकार ही केवळ आर्थिक प्रगतीची चळवळ नसून सामाजिक स्थैर्य निर्माण करणारी ताकद आहे,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमात संस्थेच्या विविध योजनांची माहितीही देण्यात आली. सभासदांसाठी पतसंस्थेच्या योजनांचा लाभ कसा घ्यावा, पतसंस्थेच्या माध्यमातून बचतीची सवय कशी जोपासावी, तसेच कर्ज व्यवस्थापन व गुंतवणुकीच्या संधी याविषयी सखोल चर्चा करण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे कर्मचारी श्री प्रशांत सोनावणे, ज्येष्ठ सभासद श्री बाळकृष्ण वाघ, श्री सुरेश जाधव यांनी संस्थेविषयी चे प्रेम आपल्या मनोगतात व्यक्त केले.
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांची सहकार भारतीच्या सातारा जिल्ह्याच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल व संचालक श्री अमर कोल्हापुरे यांना विविध क्षेत्रात ते करीत असलेल्या कार्याबद्दल हॉंगकॉंग येथे होणाऱ्या आंतर राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सभासदांच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष ॲड श्री रमेश यादव, संचालक श्री अमर कोल्हापुरे, श्री मदन साळवेकर, डॉ मंगला अहिवळे, श्री श्रीकांत शिंदे , श्री शरद चव्हाण, श्री सालीम्भाई वागवण, श्री सागर मुळे, श्री वैभव फुले, श्री भूषण तारू, श्रीमती नीला कुलकर्णी, श्रीमती अलका घाडगे, मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार, संस्थेचे इतर अधिकारी, कर्मचारी वृंद तसेच मोठ्या संख्येने सभासद आणि हितचिंतक उपस्थित होते.
उत्कर्ष पतसंस्थेच्या या उपक्रमामुळे सहकार क्षेत्राबद्दल नवीन जागरूकता निर्माण होईल, तसेच सभासद आणि ग्राहक यांच्यात अधिक विश्वास आणि सक्रिय सहभाग वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
