उरमोडी धरणाचे चे पाणी उशाला, कोरड घशाला
सातारा (अली मुजावर )-पाणी डोळ्याने दिसतंय पण प्यायला मिळत नाही. धरण उशाला अन् कोरड घसाला अशी अवस्था या परळी खोऱ्यातील कारी, सोनवडी, गजवडी, आरे, दरे, करंडी, आंबळे, रायधर गावकऱ्यांची झाली आहे.ऐन उन्हाळ्यामध्ये परळी खोऱ्यातील या गावांची पाण्यासाठी वणवण होत आहे. या परिसरातील आंबळे पूरक जलाशयास गती दिल्यास या परिसरातील पाणी प्रश्न कायमचा मिटू शकतो. यासाठी शासन दरबारी हालचाल होणे गरजेचे आहे.
“उरमोडी प्रकल्पाची विश्वासार्हता ७५ टक्के इतकी सुधारण्यासाठी तसेच उरमोडी प्रकल्पातंर्गत नियोजित टप्पा क्र.१ उपसा योजना वगळून त्या क्षेत्रास प्रवाही पध्दतीने पाणी देणे व विजेवरील खर्च कायम स्वरुपी कमी करण्यासाठी आंबळे पूरक जलाशय (ता. सातारा) ही योजना उरमोडी प्रकल्पाचा भाग म्हणून समावेश करण्यास उरमोडी प्रकल्पास वेगवर्धित सिंचनलाभ कार्यक्रमांतर्गत केंद्रीय अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अटीवर नियामक मंडळाची तत्वतः मान्यता ही 2009 साली देण्यात आली असून ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.
परळी विभागातील आंबळे पूरक जलाशयाच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या कारी, सोनवडी, गजवडी, आरे, दरे, करंडी, आंबळे, रायधर या गावातील जलाशयाचे काम मार्गी लावणेबाबत आपले स्तरावर लवकरात लवकर बैठक घेऊन अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या या आंबळे पुरक जलाशय या गंभीर प्रश्नावर मार्ग काढून जनतेला न्याय मिळवून द्यावा यासाठी शहाजी मुसळे आणि परळी परिसरातील ग्रामस्थांनी याबाबतचे निवेदन नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना दिले असून याबाबत योग्य ती कारवाई करणार असल्याचे आश्वासन नामदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दिले आहे.
