उपोषणाचा पाचवा दिवस सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांची प्रकृती खालावली
सातारा – महाराष्ट्र राज्यातील बारा हजार छोट्या मोठ्या ठेकेदारांचे सुमारे ४९ हजार कोटी रुपये बिल शासनाकडून थकवले गेले आहेत. त्याचा पहिला बळी ठेकेदार हर्षद पाटील यांचा झाला. उर्वरित ठेकेदारांचा जीव वाचवण्यासाठी आणि झोपी गेलेल्या शासन आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्री रमेश अनिल उबाळे सोमवार दिनांक ४ ऑगस्ट पासून सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केले आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांनी उपोषणाला पाठिंबा दिला आहे.
राज्यासह जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागासह ग्रामविकास, जलजीवन मिशन, जलसंधारण सारख्या अनेक योजनांची कामे होऊन सुद्धा बिले थकविण्यात आली आहेत. अनेक छोटेमोठे कंत्राटदार ही कामे करीत आहेत. मात्र कंत्राटदारांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास शासनाला वेळ नसल्याचे दिसत आहे. ठेकेदारांच्या प्रश्नाबाबत वेळावेळी निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांची देयके तातडीने देण्यात यावीत. यावर कंत्राटदार, त्यांच्याकडे कामे करणारे कामगार, अन्य व्यावसायिक यांची वर्षानुवर्ष देयके रखडली आहेत. त्यामुळे आर्थिक ओढाताण होत असून उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कंत्राटदार आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत त्यामुळेच रमेश उबाळे यांनी महाराष्ट्रातील या ज्वलंत विषयाचा मुद्दा लावून धरत उपोषणाचें हत्यार उपासले आहे . पाचव्या दिवशी त्यांचीं प्रकृती खालवली असून यासाठी सर्वस्वी शासन जबाबदार असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
सातारा जिल्ह्यातील मंत्री महोदय आणि आमदार खासदारांनी ही उपोषण करते रमेश उबाळे यांची भेट घेतली नसून नक्की लोकप्रतिनिधी करतात काय असा सवाल रमेश उबाळे यांनी केला.
