स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त हिंदवी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचा अनोखा विक्रम
सातारा प्रतिनिधी : ‘शारीरिक सामर्थ्य हाच जीवनाचा आधार आहे,’ हा स्वामी विवेकानंदांचा संदेश आचरणात आणत, हिंदवी पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद जयंती तथा राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अनोखा विक्रम प्रस्थापित केला. शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे तब्बल ६५ हजार सूर्यनमस्कार घालत स्वामी विवेकानंद यांना आगळीवेगळी आदरांजली वाहिली.
शाळेच्या प्रांगणात सकाळच्या प्रसन्न वातावरणात ‘ओम सूर्याय नमः’च्या जयघोषात या सूर्यनमस्कार यज्ञाला सुरुवात झाली. इयत्ता पाचवीपासून ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षमतेनुसार सूर्यनमस्कारांच्या आवर्तनांमध्ये सहभाग घेतला. एकूण ६५ हजार सूर्यनमस्कारांचा टप्पा यशस्वीपणे पार पाडून विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक क्षमतेचे दर्शन घडवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी सांगितले की, ‘‘केवळ बौद्धिक विकास नव्हे, तर शारीरिक सुदृढता हा देखील शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, लवचिकता आणि संयम वाढवण्यासाठी सूर्यनमस्कारांसारखा दुसरा उत्तम व्यायाम नाही. ६५ हजार सूर्यनमस्कारांचा हा संकल्प पूर्ण करून विद्यार्थ्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.’’
या उपक्रमासाठी योगाचार्य वैशाली भोसेकर यांनी विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण दिले होते. ६५ हजार सूर्यनमस्कारांचा हा टप्पा पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. यावेळी उपस्थित पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. या यज्ञामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याप्रती जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाची सांगता स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांच्या वाचनाने आणि राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी अमित कुलकर्णी, पंचकोशाधारित गुरुकुलच्या संचालिका रमणी कुलकर्णी, मुख्याध्यापिका ज्योती सुपेकर, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील, गुरुकुलचे संदीप जाधव, राहुल रावण, हेमलता जगताप, शिल्पा बेंदरे व शिक्षक उपस्थित होते.




