जनतेनेच त्यांची निवडणूक हाती घेतल्याने जयाभाऊंचा चौकार निश्चित आहे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
सातारा : (प्रतिनिधी)गेली १५ वर्षे मी जनतेची रात्रंदिवस सेवा करत आलो आहे, म्हणूनच गावोगावी वाढता पाठिंबा मिळत आहे. विरोधातील प्रभाकर घार्गे आणि महाविकास आघाडीचे टोळके त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नसल्याने निवडणूक जाती – पातीच्या राजकारणावर, दहशत, गुंडगिरीवर नेत आहेत. त्यांच्याकडून अडवाअडवी आणि जिरवाजीरवी सुरु आहे. बारामतीकडून त्यांना जितकी चावी मिळाली आहे तितकी तोंडाची वाफ ते घालवतात. ते काय वायफळ बोलतात याकडे मी दुर्लक्ष करत होतो, मात्र पाणी आता डोक्यावरुन जायला लागले आहे. एक तर मी कुणाच्या वाटेला जात नाही पण विनाकारण माझ्या वाटेला कुणी गेला तर सोडतही नाही. मायणीच्या चिल्लरने तर माझा नाद करुच नये असा इशाराही त्यांनी दिला.
आ.जयकुमार गोरे यांच्या दोन्ही तालुक्यातील कोपरा सभांना जनतेतून मोठा प्रतिसाद मिळत आहे. शंभूखेड आणि मायणी येथील सभेत बोलताना आ. जयकुमार गोरे म्हणाले, मी माण – खटावच्या मातीचाबारामती, फलटणला गहाण पडलेला स्वाभिमान परत मिळवून तो वाढवत आहे. घार्गे आणि कंपनी माण – खटावचे तिकीट मागायला पवार, निंबाळकरांचे तळवे चाटत असताना इतर मतदारसंघातील इच्छुक तिकीटासाठी आमची शिफारस करा म्हणत माझ्याकडे माण – खटावमध्ये येत होते. मोठ्या परिश्रम आणि प्रयत्नाने आपण उरमोडी, जिहेकठापूर, तारळी योजनांचे पाणी दोन्ही तालुक्यात आणले आहे. जनतेने मला दिलेली जलनायक ही पदवी एखाद्या मंत्रीपदापेक्षा मोठी आहे. आत्ताच्या निवडणूकीतील लढत टोळधाड विरूध्द सामान्य जनता अशी आहे, त्यात माझ्या पाठिशी असणाऱ्या जनतेचाच विजय होणार असल्याचा विश्वासही आ. गोरेंनी व्यक्त केला.
जिल्हा बॅंक निवडणूकीच्या तिकीटावेळी इंदिराताई घार्गेंना ज्यांनी रडवले त्यांच्यापुढे प्रभाकर घार्गे नाक घासत गेले. घार्गेंनी नको त्या लोकांपुढे लाचारी पत्करली असे आ. डॉ. येळगावकरांनी सांगितले.
दरम्यान निवडणूकीच्या रणधुमाळीत आ. जयकुमार गोरे यांना मुस्लिम समाजासह सर्वच समाजांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश करुन आ. गोरेंच्या विजयाचा निर्धार केला आहे. शेखर गोरे यांनी प्रचारात सक्रिय झाल्यापासून त्यांच्या गटात इनकमिंगचा धडाका लावला आहे. गावोगावी विरोधातील अनेक मोहरे शेखर गोरेंच्या गळाला लागत आहेत.
माण – खटावसारख्या दुष्काळी भागात गेल्या १५ वर्षातील अथक परिश्रमाने अनेक योजनांचे पाणी आणून मायबाप जनतेचे अश्रू पुसणाऱ्या पाणीदार आमदार जयकुमार गोरेंचा विजयरथ सुसाट सुटला आहे. जनतेनेच त्यांची निवडणूक हाती घेतल्याने जयाभाऊंचा चौकार निश्चित आहे. केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी अनेक योजना राबविल्याने आताही राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.