उडतरे-पाचगणी रोड ठप्प पर्यटकांची गर्दी; ग्रामस्थांचा संताप वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी
उडतरे वार्ताहर : मुंबई-पुणे मार्गे पाचगणीकडे येणाऱ्या वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने गुरुवारी उडतरे परिसरातील मुख्य रस्त्यावर दिवसभर वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. पर्यटकांची वाढती संख्या, अरुंद रस्ता आणि अतिक्रमण,खोदलेले रस्ते यामुळे वाहनांचे अक्षरशः रांगा लागल्या.
कोंडीमुळे पर्यटकांसह ग्रामस्थांचे हाल झाले. शेतीतील सोयाबीन काढणीची कामे चालू असल्यामुळे आणि अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ झाली आणि त्यातच मळणी मशिन,हार्वेस्टर,ट्रैक्टर अशी वाहने यामध्ये अडकून पडली .यामुळेही शेतकऱ्यांच्या काही अंशी नुकसान झाले.भाऊबीज असल्यामुळे नागरिकांची वर्दळ ,कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक आणि बाजारपेठेत जाणारे ग्राहक या सर्वांनाच त्रास सहन करावा लागला. काही वाहनचालकांना दोन किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी तासाभराहून अधिक वेळ लागल्याची माहिती मिळाली.
“रस्त्यावर कायमच अशी परिस्थिती निर्माण होते, पण प्रशासन मात्र मूकदर्शक राहते,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली. सुट्टीच्या दिवशी वाढणारी वाहतूक पाहता रस्त्यामधील अतिक्रमण काढावे आणि रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वाहतूक कोंडीची ही समस्या सुटली नाही, तर आगामी सुट्ट्यांमध्ये परिस्थिती आणखी गंभीर होईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.तसेच शाळा आणि महाविद्यालय याच रस्त्यालगत असल्यामुळे आजूबाजूच्या गावातून येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोका दिसून येत आहे.



