‘एआय, ब्लॉकचेन आणि डिजिटायझेशनमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत वाढ’-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘एचपी ड्रीम्स अनलॉक्ड सीझन 1’चे उदघाटन संपन्न झाले.आजचा काळ हा एआयचा आहे आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सामाजिक समता निर्माण होऊ शकते. तंत्रज्ञान, डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांना भौगोलिक सीमा नाहीत. म्हणूनच हे तंत्रज्ञान प्रत्येक भारतीयाच्या कल्पनांना पंख देऊ शकते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.
आता एआय एजंट्स तयार केले जात आहेत, जे विद्यार्थ्यांना शिकवू शकतात. याचा अर्थ असा आहे की, आता आपण दुर्गम, डोंगराळ भागांतील, आदिवासी वस्त्यांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊ शकतो, जिथे शिक्षकांची कमतरता आहे. एकूणच शिक्षण, उद्योग आणि आरोग्य यांसारख्या क्षेत्रांमध्ये हे तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकते. शासनाने आता कृषीक्षेत्रातही एआयचा वापर सुरू केला आहे. पुण्यात झालेल्या ॲग्री-हॅकेथॉनमध्ये तरुणांनी तयार केलेले एआय मॉडेल हे हवेतील घटकांचे विश्लेषण करून, पिकावर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आणि त्यापासून बचावाची पूर्वकल्पना कल्पना देते. हे खरोखरच गेम-चेंजिंग मॉडेल आहे. एआय, ब्लॉकचेन आणि डिजिटायझेशन या तंत्रज्ञानांनी केवळ उद्योगच नव्हे, तर शासनप्रणालीतही पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवली असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
‘एचपी ड्रीम्स अनलॉक्ड’ या कार्यक्रमात देशभरातील जवळपास 40,000 तरुणांनी सहभाग घेतला असून, त्यापैकी 40 तरुणांच्या सर्वोत्तम कल्पनांचा सन्मान करण्यात आला. या 40 कल्पनांपैकी ज्या कल्पना समाज आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकतील, विस्तारक्षम असतील आणि लोकांचे जीवन बदलू शकतील, अशा कल्पनांसोबत शासन भागीदारी करण्यास तयार असल्याचे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी सांगितले.यावेळी एचपी इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्ता व इतर मान्यवर उपस्थित होते.
