तिन्ही रक्तवाहिन्या ब्लॉक असूनही बायपास सर्जरी टळली !सातारा डायग्नोस्टिक मध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
सातारा, दि. २ : हृदयाकडे जाणाऱ्या तीनही रक्तवाहिन्या ब्लॉक असताना एका 50 वर्षीय गृहस्थावर मिनी क्रश तंत्राचा वापर करून रोटाबलेशन अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात सातारा डायग्नोस्टिक सेंटरला यश मिळाले शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी रुग्ण चालत घरी गेला.
प्रथितयश इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या नियंत्रणाखाली ही जोखमीची शस्त्रक्रिया नुकतीच यशस्वी करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील एका ५० वर्षीय गृहस्थाला हृदयविकाराचा त्रास होता. हृदयाचे कार्य पूर्वत होणे गरजेचे होते. अन्यथा रुग्णाच्या जीवितास धोका होता. त्यावर बायपास सर्जरी हाच उपाय होता. तथापि, रुग्ण व त्याच्या नातेवाईकांची या शस्त्रक्रियेसाठी तयारी नव्हती. रुग्णाच्या जीविताचा धोका टाळण्यासाठी रोटाबलेशन अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. अद्यावत कॅथलॅब व सुसज्ज ऑपरेशन थिएटर असलेल्या सातारा डायग्नोस्टिक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली.
डॉ. जगदीश हिरेमठ, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. मधुसूदन आसावा, डॉ. सुरेश शिंदे, डॉ. निलेश साबळे तसेच हॉस्पिटलच्या कॅथलॅब टेक्निशियन निलेश, सिस्टर रमिजा सय्यद आणि आयसीयूच्या टीमने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. शस्त्रक्रियेनंतर तिसऱ्या दिवशी रुग्ण चालत गेला.
या शस्त्रक्रिया विषयी माहिती देताना डॉ. मधूसुदन आसावा यांनी सांगितले की, हृदयाकडे जाणाऱ्या मुख्य रक्तवाहिनीमधून डाव्या बाजूस दोन रक्तवाहिन्या जातात. या दोन्ही रक्तवाहिन्यांच्या तोंडाला ९० ते ९५ टक्के कॅल्शियमयुक्त ब्लॉकेजेस होते. रोटाबलेशन तंत्राने कॅल्शियम दूर करण्यात आले. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. जगदीश हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्याने पार पडल्याने पुढील मोठी शस्त्रक्रिया टाळणे शक्य झाले. सुसज्ज ऑपरेशन थिएटर मध्येच अशा पद्धतीची शस्त्रक्रिया केली जाते. बायपास सर्जरीची सुविधा असलेल्या ठिकाणीच या शस्त्रक्रिया केल्या जातात. सातारा डायग्नोस्टिक सेंटर मध्ये बायपास सर्जरीची सुविधा असल्यानेच ही शस्त्रक्रिया साताऱ्यात शक्य झाली असल्याचे डॉ. आसावा यांनी स्पष्ट केले.
“मिनी क्रश तंत्र वापरून या रुग्णावर बायफर्केशन अँजिओप्लास्टी करण्यात आली. कॉम्प्लेक्स अँजिओप्लास्टी सर्रास केल्या जातात, त्यात ही अतिशय गुंतागुंतीची अँजिओप्लास्टी समजली जाते. या शस्त्रक्रियेची नोंद आंतरराष्ट्रीय कार्डियाक जर्नल मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे.
डॉ. मधुसूदन आसावा
इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट




