जावलीच्या ‘राव’ मोरे घराण्याचा दैदीप्यमान इतिहास उलगडणार; १ फेब्रुवारीला महाडमध्ये भव्य स्नेहसंमेलन
महाबळेश्वर-शिवपूर्व काळापासून आपल्या शौर्याने आणि कर्तृत्वाने जावली प्रांतावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘राव’ मोरे घराण्याचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा जनमानसात मांडला जाणार आहे. ‘जावलीकर राव मोरे परिवार सामाजिक संस्था, मुंबई’ यांच्या वतीने समस्त जावलीकर ‘राव’ मोरे परिवाराचे द्वितीय स्नेहसंमेलन रविवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी महाड येथे आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘ऐतिहासिक व्याख्यान (भाग २)’. मौर्य काळापासून ते जावलीकर मोरे घराण्यापर्यंतचा प्रवास, स्वराज्य स्थापनेपूर्वीची जावलीची स्थिती आणि स्वराज्य उभारणीतील संवेदनशील सत्ता-संघर्ष यावर प्रकाश टाकला जाणार आहे. प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि ज्येष्ठ इतिहासकार अप्पा परब यांच्या सुकन्या शिल्पा परब या ‘तर्क, अफवा आणि वस्तुस्थिती’ या विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करणार आहेत.
संमेलनाची उद्दिष्टे आणि गरज:
“इतिहास जर आपण मांडला नाही, तर तो विकृत केला जातो,” या भावनेतून हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मोरे घराण्याचा तेजस्वी इतिहास आजही समाजासमोर पूर्णपणे आलेला नाही. विखुरलेल्या कुटुंबांना एकत्र आणणे, तुटलेली नाती जोडणे आणि भावी पिढीला आपल्या कुळाची खरी ओळख करून देणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा तपशील
▪️तारीख:रविवार, १ फेब्रुवारी २०२६
▪️वेळ:सकाळी १०:०० ते दुपारी ०२:००
▪️स्थळ:भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, नवीन महाड नगरपालिका इमारतीजवळ, महाड.
▪️प्रमुख आकर्षण: ऐतिहासिक व्याख्यान, कुलस्नेह भेट आणि सहभोजन.
उपस्थितीचे आवाहन
हा कार्यक्रम केवळ एक मेळावा नसून ते एक ‘कर्तव्यस्मरण’ आहे. आपल्या कुळाचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी समस्त ‘राव’ मोरे परिवाराने सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन जावलीकर राव मोरे परिवार सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी.९८१९०५३२६२ ९९२३०२००२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



