ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाच्या सरी कोसळणारच
सातारा -मे महिन्यात सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर संपत आला तरी थांबताना दिसत नाही. ऐन दिवाळतही पाऊस कोसळला. मात्र हा पाऊस ऑक्टोबर अखेरपर्यंत कोसळण्याचा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. यंदाच्या वर्षात पूर्वमोसमी पाऊस कोसळला, नंतर मोसमी पाऊस आणि त्यानंतर उत्तर मोसमी पाऊसही सुरूच आहे. त्यामुळे पावसाचा काळ जवळपास सहा महिने झाला आहे. यंदाचे निम्मे वर्ष पावसात गेले आहे. आणखी काही काळ याच पावसाचा सामना करावा लागणार आहे.
दिवाळीनंतरही महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित झाला आहे. मान्सून अजून गेला नाही का, पण हवामान तज्ज्ञांच्या मते, पाऊस फक्त दक्षिण-पश्चिम मान्सूनपुरता मर्यादित नसतो. दरवर्षी जून ते सप्टेंबर हा महाराष्ट्रासाठी मुख्य मान्सूनचा काळ असतो. मात्र, या काळाच्या बाहेरही विविध हवामान प्रणाल्यांमुळे अधूनमधून पाऊस होऊ शकतो, अशी माहिती हवामान तज्ञ व्यक्त करत आहेत.
या वर्षी मात्र परिस्थिती वेगळी राहिली आहे. मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत सलग विविध हवामान प्रणाली सक्रीय राहिल्याने सतत पावसाचा अनुभव आला आणि त्यामुळे मान्सून जणू सहा महिने चालल्याची भावना निर्माण झाली आहे.
या वर्षीचा दक्षिण-पश्चिम मान्सून नेहमीपेक्षा थोडा लवकर म्हणजे २६ मे रोजी सुरु झाला आणि नियोजित वेळेत म्हणजे १० ऑक्टोबर रोजी परत गेला. १५ ऑक्टोबरपासून तयार झालेल्या अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणासह महाराष्ट्राच्या काही भागांत पुन्हा पाऊस सुरू आहे. अरबी समुद्रातील हा पट्टा कोकण किनाऱ्याच्या समांतर उत्तर दिशेने सरकत असल्याने हा पावसाचा टप्पा ऑक्टोबर अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.



