पुण्यात चालकाच्या वैयक्तिक रागामुळे चार जण होरपळले; हिंजेवाडीत ‘ती’ बस पेटली नाही, पेटवली होती!
पुण्यातील हिंजेवाडी भागात बुधवारी सकाळी एका मिनी बसनं अचानक पेट घेतल्यानं खळबळ उडाली. हिंजेवाडी परिसरातील आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घर ते ऑफिस आणि पुन्हा ऑफिस ते घर अशी प्रवास सेवा पुरवणाऱ्या या मिनी बसने पेट घेतल्यानंतर त्यात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. पण या प्रकरणाला आता मोठी कलाटणी मिळाली असून चालकानंच वैयक्तिक रागातून बस पेटवून दिल्याचं स्पष्ट झालं आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. पण पोलिस तपासात नवी माहिती समोर आली आहे.
बुधवारी हिंजेवाडी भागातील व्योम ग्राफिक्स कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वारजे माळेवाडी भागातून कंपनीत नेण्यासाठी ही मिनी बस आली होती. हिंजेवाडी फेज एक परिसरात येताच मिनी बस चालू असतानाच तिनं पेट घेतला. काही क्षणांत आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. याआधीच चालक व पुढच्या भागात बसलेल्या काहींनी बाहेर उड्या टाकल्या होत्या. पण मागे बसलेल्या चौघांना बाहेर पडता आलं नाही.
मिनी बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात होता. आयटी कर्मचारी संघटनेकडून यासंदर्भात निषेधही व्यक्त करण्यात आला होता. या मिन बसेसचं सेफटी ऑडिट केलं जात नाही, असा आरोप करण्यात आला होता. पण आता ही आग शॉर्ट सर्किटमुळे नसून या बसच्या चालकानंच लावली होती, असा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा सविस्तर तपास केला असता नेमकं कारण उघड झाल्याची माहिती पुणे पोलिसांनी यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बसचा चालक जनार्दन हंबर्डीकर गेल्या १२ वर्षांपासून संबंधित कंपनीसोबत काम करत होता. पण कंपनीत काही लोकांकडून आपल्याला दिल्या जाणाऱ्या वागणुकीचा राग त्याच्या मनात होता. या रागातून त्यानं हे कृत्य केल्याचं नंतर पोलिस तपासात कबूल केलं आहे.
पोलिसांनी सांगितलं की सुरुवातीला ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असं आम्हाला वाटलं. झोन २ चे डीसीपी विशाल गायकवाड म्हणाले, “आधी आम्ही अपघाती निधनाचं प्रकरण नोंद केलं. पण या दुर्घटनेशी संबंधित अनेक बाबींचा आढावा घेतल्यानंतर आम्हाला सगळा प्रकार लक्षात आला. ज्या प्रकारे आगीचा वेगाने भडका उडाला, ते पाहता आम्हाला संशय आला. बसमधील एखाद्या शॉर्ट सर्किटमुळे एवढी मोठी आग कशी लागू शकेल? असा आम्हाला प्रश्न पडला. मग आम्ही सदर मिनीबसची तपासणी केली आणि फॉरेन्सिक अहवाल मागवला”.
“मिनीबसमधून बाहेर उडी टाकल्यानंतर चालक बेशुद्ध झाला होता. रुग्णालयात उपचारांदरम्यान त्याला शुद्ध आल्यानंतर आम्ही त्याची चौकशी केली. यावेळी त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. अतिशय थंड डोक्याने हे सगळं चालकानं घडवून आणलं होतं”, असंही गायकवाड यांनी नमूद केलं.
दरम्यान, आरोपी जनार्दन हंबर्डीकर याने आदल्या दिवशीच बसमध्ये ज्वालाग्राही रसायन आणून ठेवलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. बस हिंजेवाडीजवळ येताच त्यानं चिंध्या पेटवून केमिकलमध्ये टाकल्या आणि आगीचा भडका उडाला. “सामान्यपणे अशा प्रकरणांमध्ये प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी असते. पण आगीचा भडका इतक्या वेगाने झाला की आम्हाला संशय आला. आधीच असं कुठलं केमिकल गाडीत ठेवलं होतं का? या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला”, असं पोलीस उपायुक्त गायकवाड यांनी नमूद केलं.
