प्रतापसिंह महाराज उद्यानाची दुरावस्था; शिवसेना उध्दव बाळासाहेब गटाचा आंदोलनाचा इशारा.
महाबळेश्वर: छत्रपती शिवाजी महाराजांचे आठवे वंशज आणि महाबळेश्वर नगरीचे संस्थापक, छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या २३२व्या जयंतीच्या निमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मात्र, याचवेळी शहरातील ऐतिहासिक श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उद्यानाची दुरावस्था लक्षात आणून देण्यात आली.

गेले अनेक वर्षे हे उद्यान वनविभागाच्या ताब्यात असून, लाखो पर्यटक दरवर्षी येथे भेट देत असतानाही उद्यानाची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याची तक्रार शिवसेनेने केली. उद्यानातील छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे स्मारक, मुख्य प्रवेशद्वार आणि उद्यान परिसर प्राण्यांचे अवशेष व वनस्पती संग्रहालय या ठिकाणी झालेली दुरावस्था दुरूस्त करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
याबाबत बोलताना शिवसेना शहराध्यक्ष राजाभाऊ गुजर यांनी सांगितले की, “छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या स्मारकाची ही अवस्था पाहून खूप दुःख होत आहे. वन विभागाला याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जर याकडे दुर्लक्ष करण्यात आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहराच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.”
यावेळी सातारा जिल्हा संघटिका प्रमुख राजश्री ताई भिसे, उपशहर प्रमुख राजेश साळवी, लक्ष्मीताई मालुसरे, शिल्पा ताई ठक्कर, वसुधा बगाडे, शंकर ढेबे,शहानवाज भाई खरकंडे, दिपक ताथवडेकर,शहनवाज महापुळे, जितेश कुंभारदरे, पत्रकार राजेश सोंडकर शहर शिवसेना व महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते.




