वाहन चालकांना दिलासा; कर वाढला पण पेट्रोल-डिझेलचे भाव जैसे थे
भारतीय नागरिकांना महागाईच्या झळा बसत असतानाच केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरील उत्पादन शुल्क वाढवलं आहे. केंद्र सरकारने सोमवारी (७ एप्रिल) पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली. हे बदल मंगळवारपासून लागू झाले आहेत. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपये करण्यात आलं आहे. दरम्यान, इंधनावरील कर वाढला असला तरी पेट्रोल-डिझेलचे भाव जैसे थे स्थितीत आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी जाहीर केलं आहे की पेट्रोल व डिझेलच्या किरकोळ किंमती वाढवलेल्या नाहीत. इंधनाचे दर होते तसेच आहेत. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने एक्सवर एक पोस्ट करून याबाबतची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये आधीच कपात झालेली आहे. त्यामुळे उत्पादन शुल्क वाढीचा पेट्रोल-डिझेलच्या किरकोळ किंमतींवर परिणाम झाला नाही.
वाढत्या महागाईदरम्यान केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवलं आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किरकोळ किमती वाढतील असं अनेकांना वाटत होतं. तसं झाल्यास सामान्य नागरिकांचं बजेट हलण्याची शक्यता होती. मात्र, तेल विपणन कंपन्यांनी तेलाच्या किंमती वाढवल्या नाहीत.
