वडिलोपार्जित जमीन वाटप आता फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्पवर होणार; महसूलमंत्र्यांची घोषणा
मुंबई -वडिलोपार्जित जमीन आणि मालमत्तांची मुला-मुलींच्या नावावर कायदेशीर वाटणी करण्यासाठी आता मोठा दिलासा मिळणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली असून, या वाटणीसाठी केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर काम होणार आहे. महसूल विभागाच्या या प्रस्तावित निर्णयामुळे सामान्य नागरिकांची ५ ते ३० हजार रुपयांपर्यंतची मोठी बचत होणार आहे.
सध्या वडिलोपार्जित जमीन किंवा वडिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची मुलांमध्ये वाटणी करायची झाल्यास त्यासाठी एक ते दोन टक्के स्टॅम्प ड्यूटी आणि नोंदणी शुल्क भरावे लागते, ज्यामुळे मोठा खर्च येतो.
जमिनीच्या बाजारमूल्याच्या प्रमाणात एक ते तीन हजार रुपयांपर्यंत नोंदणी शुल्क आणि ५०० रुपयांचा स्टॅम्प लागतो.
दोन टक्के स्टॅम्प ड्यूटी आणि एक टक्का नोंदणी शुल्क भरावे लागते.मुलींच्या किंवा बहिणींच्या नावे करण्यास एक टक्का स्टॅम्प ड्यूटी आणि २०० रुपयांचा स्टॅम्प लागतो प्रस्तावित नवीन कार्यपद्धती महसूल विभागाच्या प्रस्तावित निर्णयानंतर कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क न भरता, केवळ ५०० रुपयांत वडिलोपार्जित मालमत्तेचा हिस्सा मुला-मुलींच्या नावावर करता येणार आहे.यासाठी सर्व वारसदारांची संमती आवश्यक असेल.वाटप होणारे क्षेत्र निश्चित करून ५०० रुपयांचा स्टॅम्प तयार करावा लागेल.
हा स्टॅम्प दुय्यम निबंधक कार्यालयात सादर केल्यावर संबंधित मुलांच्या नावावर क्षेत्र हस्तांतरित होईल.महसूलमंत्री बावनकुळे यांनी ही घोषणा केली असली तरी, यासंदर्भातील शासन निर्णय (GR) अजून जारी झालेला नाही. शासन निर्णय निघाल्यानंतरच या नवीन नियमानुसार कार्यवाही सुरू होईल.
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ८५ नुसार,संयुक्त मालकीच्या जमिनीत वाद नसल्यास सहधारक जिल्हाधिकाऱ्यांकडे वाटणीसाठी अर्ज करू शकतात.मालकी हक्काबाबत वाद असल्यास मात्र दिवाणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाटणी थांबते.न्यायालयीन आदेशानंतर तहसीलदारांमार्फत होणाऱ्या वाटणीसाठी आजही कोणतेही शुल्क लागत नाही.हा नवीन निर्णय केवळ संमतीने होणाऱ्या वाटणीसाठी लागू असेल.या निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना वडिलोपार्जित मालमत्तेची नोंदणी आणि वाटणी प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि स्वस्त होणार आहे.




