राष्ट्राचे उज्वल भवितव्य घडविण्याची शिक्षकांमध्ये क्षमता इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे
डॉ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान
सातारा : महाराष्ट्राला अनेक महापुरुषांच्या विचारांचा वारसा आहे. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्यामुळे देशाची जडणघडण झाली. याच विचारांचे पाईक होऊन शिक्षक ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात काम करीत असतात. देशाची नवी पिढी सक्षम आणि विधायक विचारांची घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. शिक्षकांमध्ये राष्ट्राचे उज्वल भवितव्य घडविण्याची क्षमता असल्याचे मत इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांनी व्यक्त केले.
सातारा येथे बहुजन शिक्षक संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिक्षक संमेलनात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉॅ. आ. ह. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उदय भंडारे , उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे , माजी अध्यक्ष प्रवीण लादे , दिपक भुजबळ , शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव , सचिव महेश लोखंडे , मिलींद कांबळे , नितीन जाधव , विष्णू ढेबे , राजू कारंडे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले , ज्ञानज्योतीने प्रतिकुल परिस्थितीत म.फुले यांच्या सहाय्याने शैक्षणिक काम केले होते. त्यामुळे बहुजनासाठी शिक्षक आदर्शवत कार्य करीत आहे. समाजामध्ये विविध घटक कार्यरत असले तरी सर्वोत्कृष्ट कार्य हे शिक्षकच करीत असतो.
उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे म्हणाले, अन्यायाविरोधात संघटना संघटीत झाल्या पाहिजेत. स्वतःबरोबरच देश विकसित झाला पाहिजे. तरच विश्व अधिक विकसित होईल. शाळा ही समाजाची एक छोटीशी प्रतिकृती आहे. त्यामुळे शिक्षकाची जबाबदारी महत्वाची आहे. तेव्हा महापुरुषांच्या विचारानेच संघटन वाढविले पाहिजे.
उदय भंडारे म्हणाले, “शिक्षकांच्या विविध संघटना कार्यरत आहेत.आम्ही जिल्ह्यात रोपटे लावले असून लवकरच राज्य स्तरांवर कार्यक्षेत्र वाढवणार आहोत.
यावेळी दशरथ ननावरे यांनी छत्रपती शिवराय ते डॉ. आंबेडकर यांसह सर्वच महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला. यावेळी दिल्ली दौर्यातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आले.
नलिनी बैले व सुवर्णा साळवी यांनी सूत्रसंचालन केले. तर राजाराम साळे यांनी आभार मानले.