ठाकरे बंधूंच्या युतीची आज दुपारी १२ वाजता घोषणा होणार; संजय राऊत यांची माहिती
मुंबई- अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेचा अखेर मुहूर्त ठरला असून 24 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होईल. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली.
मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांची जागावाटपासंदर्भात बैठक झाली असून आता दोन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. या दोन्ही नेत्यांकडून आज दुपारी ठाकरे बंधूंच्या युती आणि जागावाटपाची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे, मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना-मनसे एकत्र आल्याने ठाकरेंची ताकद वाढली आहे.
शिवसेना आणि मनसेची युती कार्यकर्त्यांनी युती स्वीकारली आहेत. कोणाच्या मनात संभ्रम नाही. तशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या आहेत. एकत्र येऊन सर्व कामाला लागले आहेत. मनोमिलन झालेलं असून जागावाटपवर काल रात्री शेवटचा हात फिरवला गेला, असं संजय राऊतांनी सांगितलं होतं. युती झालेली आहे, केवळ जागावाटपासंदर्भातली घोषणा बाकी आहे. आमच्यात जागावाटपावरून कोणताही विसंवाद नाही. वरळीमधील डोमममध्ये जेव्हा दोन भाऊ एकत्र आले तेव्हाच युती झाली, असंही संजय राऊत म्हटलं. त्यानुसार, आता ट्विट करुन संजय राऊत यांनी युतीच्या घोषणेचा मुहूर्त सांगितला आहे.




