बांगलादेशात पुन्हा तणाव, शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर आंदोलकांनी केली जाळपोळ
बांगलादेशमध्ये ‘इन्कलाब मंच’चे युवा नेते शरीफ उस्मान हादी यांचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले आहे. १२ डिसेंबर रोजी शरीफ उस्मान हादी यांच्यावर प्रचारादरम्यान अज्ञातांनी गोळीबार केला होता. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये ही घटना घडली होती. हादी यांच्यावर सिंगापूरमधील रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात झालेल्या आंदोलनात हादी सहभागी होते.
शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हादी यांचे समर्थक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. तसेच काही भागात जाळपोळ केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ‘इन्कलाब मंच’ने ढाकामधील शाहाबाग परिसरात एकत्र येण्याचे आवाहन हादी यांच्या समर्थकांना केले होते. हादी हे बांगलादेशातील विद्यार्थी नेते म्हणून उदयास आले होते. ढाका विद्यापीठातील ‘जातीया छात्र शक्ती’ या विद्यार्थी संघटनेने शोकयात्रा काढून हादी यांच्या हत्येचा निषेध केला आहे. हादी यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
ढाकामधील ‘जातीया छात्र शक्ती’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशचे गृह खात्याचे सल्लागार जहांगीर आलम चौधरी यांच्या घराला आग लावल्याची घटना घडली. तसेच बांगलादेशातील सर्वाधिक खप असलेल्या वृत्तपत्रांपैकी एक ‘प्रोथोम अलो’ या वृत्तपत्राच्या कार्यालयाला आग लावण्यात आली. त्यावेळी अनेक पत्रकार व नागरिक इमारतीत अडकल्याची माहिती समोर आली आहे. आंदोलकांनी आधी इमारतीला घेराव घातला व नंतर आग लावली. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना तसेच आवामी लिग विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली.



