टीम इंडियाने इंग्लंडच्या तोंडचा घास हिसकावला; मँचेस्टर कसोटी ड्रॉ
मँचेस्टर- भारतीय संघ चौथा सामना गमावेल, असे इंग्लंडला कदाचित वाटले असेल. इंग्लंडचा संघ विजयाचे सेलिब्रेशन करण्यात गुंग होता. पण त्याचवेळी भारतीय संघाने इंग्लंडचे गर्वहरण केले आणि मँचेस्टरचा गड राखला. भारतावर यावेळी पराभवाची नामुष्की ओढवली होती. पण भारताने पाचव्या दिवशीही दिमाखदार खेळ केला आणि हा सामना ड्रॉ राखण्यात त्यांना यश आले. या सामन्यात गिलनंतर (१०३) रवींद्र जडेजा (नाबाद १०७) आणि वॉशिंग्टन सुंदर (नाबाद १००) यांनीही शतक झळकावत इंग्लंडला हतबल करून सोडले. भारताने ४ बाद ४२४ अशी धावसंख्या करत आपला डाव घोषित केला. इंग्लंडनेही यावेळी हार मानली.
इंग्लंडने या सामन्यात ६०० धावांचा पल्ला ओलांडला. भारतावरर ३११ धावांची आघाडीही घेतली होती. त्यानंतर इंग्लडने भारताने दोन फलंदाज शून्यावर बाद केले. त्यामुळे भारताचा चौथ्याच दिवशी पराभव होईल, असे म्हटले जात होते. पण त्यानंतर मैदानात शुभमन गिल आणि केएल राहुल समर्थपणे उभे राहीले. या दोघांनी चौथा दिवस खेळून काढला. पण त्यानंतरही पाचव्या दिवशी भारतीय संघावर पराभवाची टांगती तलवार होती. पण पाचव्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीला उतरला आणि त्यावेळी एक वेगळीच गोष्ट पाहायला मिळाली. पाचव्या दिवशी जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरला. तेव्हा भारतीय खेळाडूंचाा आत्मविश्वास चांगलाच दुणावला होता. राहुल आणि गिल यांनी दमदार फलंदाजी केली.

राहुल शतकासमीप आला होता. पण राहुलला यावेळी शतक झळकावता आले नाही. राहुलने यावेळी ८ चौकारांच्या जोरावर ९० धावांची खेळी साकारली. राहुलला शतक झळकावता आले नसले तरी गिलने ही कसर भरून काढली. कारण गिलने यावेळी शतक झळकावत इतिहास रचला. गेल्या ३५ वर्षांत भारताचे या मैदानातील पहिले शतक ठरले. शतकानंतर गिलला जास्त फलंदाजी करता आली नाही. लंचला १० मिनिटे असताना तो बाद झाला. भारताला हा मोठा धक्का बसला होता, पण भारताला या गोष्टीची झळ जाणवली नाही. गिल बाद झाला तरी वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीची पिसे काढली. इंग्लंडचे गोलंदाज जडेजा आणि सुंदर यांच्यापुढे नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. पण जडेजा आणि सुंदर यांनी यावेळी दमदार फलंदाजी केली आणि भारताला सामना ड्रॉ राखण्यात सर्वात महत्वाची भूमिका या जोडीने बजावली.




