टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दमदार विजय, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश
भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईत झालेल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियानं 4 विकेट्सनं विजय मिळवला. भारतीय टीमनं यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीचं 2002 साली श्रीलंकेसह संयुक्त विजेतेपद मिळवले होते. त्यानंतर 2013 साली इंग्लंडचा पराभव करत विजेतेपद पटावलं. आता 12 वर्षांनी या स्पर्धेचं तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यापासून टीम इंडिया फक्त एक विजय दूर आहे. न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दुसऱ्या सेमी फायनलमधील विजेत्याशी भारताची लढत होईल. फायनल मॅच रविवारी (9 मार्च) दुबईत होणार आहे.
ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटिंग करत टीम इंडियासमोर 265 रन्सचं आव्हान दिलं होतं. भारताकडून विराट कोहलीनं सर्वात जास्त 84 रन्स केले. त्याला श्रेयस अय्यरनं 45 रन्स करत उत्तम साथ दिली. विराट कोहली आऊट झाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या हार्दिक पांड्यानं फटेबाजी करत 24 बॉलमध्ये 28 रन्स केले.टीम इंडियाचा विजय जवळ आणला. अखेर केएल राहुलनं सिक्सर लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
