स्वातंत्र्याच्या तब्बल ७५ वर्षांनी वस्ती झाली प्रकाशमान
वीज पोहचल्याने ग्रामस्थांमध्ये आनंद , सरपंच हिरालाल घाडगे यांच्या प्रयत्नांना यश
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी हे मांढरदेव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं छोटसं गाव आहे. या गावच्या बाजूला कचरे वस्ती आणि ढेबे वस्ती अशा दोन वसाहती आजतागायत कायम अंधारात होत्या. गावाच्या निर्मितीपासूनच येथे कधी वीज पोहचली नाही. अंधारात खितपत पडलेल्या येथील ग्रामस्थांच्या जीवनात रात्रीचाही तेजोमय प्रकाश पोहचविण्यासाठी सरपंच हिरालाल घाडगे यांनी मेहनत घेतली आणि अथक प्रयत्नातून अखेर वस्तीवर वीज पोहचली. त्यामुळे ग्रामस्थांच्या चेहर्यावर आनंदाची भावना खुलली.
भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली. या कालावधीत अनेक स्थित्यंतरे पहायला मिळाली. देशातील शहरांसह ग्रामीण भागात विकासाचा नवा आयाम आकाराला आला आणि झगमगाटही झाला. मात्र तरीही खंडाळा तालुक्यातील घाडगेवाडी गावामधील मांढरदेवीच्या पायथ्याला असणाऱ्या कचरे वस्ती आणि ढेबे वस्तीवरील काळोख मिटलाच नव्हता. त्यामुळे येथील कुटुंब कायम अंधाराशीच नातं जोडून होती. कारण त्यांच्या घरापर्यंत साधे विज कनेक्शन पोहोचलेच नव्हते.
घाडगेवाडीच्या सरपंचपदाचा हिरालाल घाडगे यांनी कारभार हाती घेतल्यानंतर गावातील मुलभूत गरजांवर लक्ष केंद्रीत करून कामे केली. या वस्तीवर वीज पोहचावी यासाठी आमदार मकरंद पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर दोन्ही वस्तींवर वीजपुरवठा होण्यासाठी ते काम जिल्हा नियोजन समितीच्या निधीत समावेश करून निधी मंजुर करुन दिला. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी हे काम अतिशय जिद्दीने , चिकाटीने पुर्ण केले. त्यामुळे अल्पावधित हे काम पूर्णत्वास गेले.
॥ कित्येक दशकाचा प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली. या कामामुळे लोकांच्या चेहर्यावरील आनंद आपल्या कष्टाचे चीज झाल्याची जाणीव करून देतात. आधुनिक काळात या कुटुंबांना साधी लाईट नसावी यासारखे दुर्देव नव्हते पण आमच्या प्रयत्नांना यश आले. या वस्तीवरील कुटुंबांचे केवळ घर नव्हे तर जीवन उजळले याचे समाधान वाटते. ॥ हिरालाल घाडगे , सरपंच