वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेसचे दमदार शक्ती प्रदर्शन; पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत तीनही उमेदवारांचे अर्ज दाखल
कराड: वारुंजी जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य रॅली काढत तीनही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून हजारो काँग्रेस कार्यकर्ते व समर्थकांनी सहभाग नोंदविला.
या प्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील हेही उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना केले.या भव्य रॅलीमध्ये वारुंजी जिल्हा परिषद गटासाठी सौ. सुनंदा नामदेव पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे वारुंजी पंचायत समिती गणासाठी रवींद्र बडेकर तसेच कोयना वसाहत पंचायत समिती गणासाठी श्रीकांत पाटील यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केले.
रॅलीदरम्यान काँग्रेस पक्षाच्या घोषणा, ढोल-ताशांचा गजर आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. वारुंजी जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी, त्यांच्या प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी काँग्रेस पक्ष सदैव तत्पर राहील, असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.
या शक्ती प्रदर्शनामुळे वारुंजी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपली ताकद दाखवून दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.




