अत्याधुनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची उभारणी करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यातील नागरिकांना किमान 5 किमीच्या आतमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न
मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले की, राज्यातील नागरिकांना किमान 5 किमीच्या आतमध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत, सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा महामंडळाची स्थापना करून अत्याधुनिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभाराव्या तसेच तमिळनाडू राज्याच्या धर्तीवर आपल्या राज्यात 13 आरोग्य सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध कराव्यात. आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त योजना व आरोग्य सुविधा ऑनलाईन कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील नागरिकांना आरोग्य सेवा सहज आणि परवडणाऱ्या दरात मिळाव्यात यासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले की, आरोग्य सेवेसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, आयुष्मान भारत व राज्य सरकारच्या विमा योजनांतर्गत सरकारी व खासगी रुग्णालयांची संख्या वाढवणे तसेच ग्रामीण भागात जिथे आरोग्य सुविधा नाहीत तिथे आयुष्यमान आरोग्य मंदिरे उभारण्यात यावीत याबाबत गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.आयुष्मान भारत व राज्य सरकारच्या विमा योजनांतर्गत सरकारी व खासगी रुग्णालयांची संख्या वाढवणे, मोबाईल हेल्थ युनिट्स आणि टेलीमेडिसिनचा विस्तार आणि आरोग्य विभागाच्या डेटा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यासंदर्भात निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
यावेळी बैठकीला मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्याच्या मुख्य सचिव व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
