किसन वीर व किसन वीर – खंडाळा कारखान्याच्या शेतकऱ्यांचे सोसायटी व्याजापोटी जमा केले ३०कोटी रुपये-प्रमोददादा शिंदे
किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सोसायटी कर्जखाती ३०कोटी रूपये जमा केल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रमोददादा शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, किसन वीर व खंडाळा कारखान्याकडे ५ लाख ५८ हजार ३०४ मे. टनाचे गाळप झाले होते. दोन्ही कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या नावावर सोसायटीचे कर्ज होते. त्या कर्जाच्या व्याजाची रक्कम रू. ३० कोटी कारखान्याने संबंधित शेतकऱ्यांच्या नावे वर्ग केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना नविन कर्ज घेणे शक्य होणार आहे. दोन्ही कारखान्यांना कोणतीही वित्तसंस्था आर्थिक पुरवठा करीत नसल्याने कारखाना व्यवस्थापनास साखर विक्री करूनच शेतकऱ्यांना ऊस बील द्यावे लागत आहे. परंतु सध्या बाजारपेठेत साखरेचे भाव जवळपास ३३. ५० रूपयांवर आलेले असुन त्यामध्ये ऊस बील ३ हजार रुपये व इतर खर्च जाता कारखान्यास अधिक तोटा होऊन कारखाना अधिक अर्थिक गर्तेत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचालक मंडळाने साखर विक्री थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. नजिकच्या काळात साखरेचे भाव वाढण्याची शक्यता असुन त्यावेळी आपण शेतकऱ्यांची सर्व ऊस बील खात्यावर जमा करणार आहोत. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चांगुलपणा दाखवुन जे सहकार्य केले आहे तेच यापुढेही करावे, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले आहे.
आपले नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या मदतीने आपल्या दोन्ही कारखान्यांना थकहमी मंजुर झालेली आहे. त्यामुळे दोन्ही कारखान्याच्या अडचणी लवकरच दुर होण्यास मदत होणार आहे. कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली किसन वीर व खंडाळा कारखान्याला नक्कीच सुगीचे दिवस येऊन शेतकऱ्यांना सोनेरी दिवस येणार असुन सभासदांनी ऊस बीलासाठी विलंब होऊनदेखील कारखान्याचे संचालक मंडळाप्रती विश्वास दाखवुन सहकार्य केल्याबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आभार प्रमोददादा शिंदे यांनी मानले आहेत.