सामाजिक दायित्वातून वाघोशी शाळेला क्रीडा लायब्ररी ..
खंडाळा : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व बौद्धीक गुणवत्ता वाढीबरोबरच शारीरिक व मानसिक क्षमता विकास होण्याच्या दृष्टीने खेळाला खूप महत्त्व असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षमतांचा सराव घेता यावा यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून वाघोशी उच्चप्राथमिक शाळेला विविध खेळांच्या साहित्याचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील प्रवीण मसालेवाले यांचेकडून वाघोशी येथील जिल्हा परिषद शाळेला याच दृष्टिकोनातून क्रीडा साहित्य उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टीच्या वेळेस विविध साहित्याद्वारे खेळाचा आनंद घेता येणार आहे. विद्यार्थी मनसोक्त खेळात रंगून जाणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबद्दल विशेष गोडी, आवड निर्माण होईल. निश्चितच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही आश्वासक अशी सुरुवात आहे. ग्रामीण भागातील शाळेत खेळालाही विशेष महत्व देऊन सराव घेतला जात असल्याने देशाला नवे प्रतिभावंत खेळाडू मिळतील.
या साहित्यात बॅडमिंटन , टेनिस , हॉलीबॉल , फुटबॉल , रस्सीखेच , थाळीफेक, गोळाफेक, क्रीकेट यासह विविध खेळाच्या साहित्याचा समावेश आहे. शाळेला क्रीडा साहित्यालय उभारण्यासाठी पोपटराव काळे आणि विकास भुजबळ यांनी विशेष प्रयत्न केले. शाळेला साहित्य वितरित करताना मुख्याध्यापक श्रीरंग जाधव , क्रीडा शिक्षक दत्तात्रय धायगुडे , सरपंच साहेबराव धायगुडे , शाळा समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थ उपस्थित होते.