क्षमता वृद्धी प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास
खंडाळा : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणात विद्यार्थ्यांना व्यवसाय कौशल्य विकसित करण्यासाठी तसेच भविष्यात येऊ घातलेल्या एकवीसाव्या शतकातील कौशल्य व भविष्यवेधी शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षकांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने क्षमता वृद्धी प्रशिक्षण देण्यात आले.
बावडा येथील राजेंद्र विद्यालयाच्या भागशाळेमध्ये इयत्ता ९ वी ते १२ वी या वर्गांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना राष्ट्रीय धोरण २०२० अंतर्गत विविध कौशल्य व भविष्यवेधी शिक्षण यावर आधारित या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय अभ्यासक्रमात भविष्यात येऊ घातलेल्या कौशल्य विकास शिक्षणाचा समावेश आहे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रत्येक शाळेत कोणते उपक्रम राबविता येतील याची चर्चा करण्यात आली. पुढील शैक्षणिक वर्षात शाळेत पूर्वतयारी कशी असावी याचेही विवेचन करण्यात आले. या प्रशिक्षणाला जिल्हा प्रशिक्षण संस्थेचे अधिष्ठाता कृष्णा फडतरे तसेच गटशिक्षणाधिकारी सुजाता जाधव यांनी भेट देवून मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या विषयाचे सखोल मार्गदर्शन करण्यासाठी विषय तज्ञ दास लोखंडे , अजित गाढवे , विजय पिसाळ , उमेश जगताप , दत्तात्रय राऊत , वैशाली झाल्टे , सविता गायकवाड , सुवर्णा सरोदे ,उज्वला शिंदे , लक्ष्मीकांत कडू , बालाजी जाधव या तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. स्वागत पंढरीनाथ निगडे यांनी केले तर सायसिंग पावरा यांनी आभार मानले.
