इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांना ‘ शिवसमर्थ पुरस्कार ‘ जाहीर …
पाटण : पाटण तालुल्यातील रामघळ कुबडीतीर्थ ट्रस्ट यांच्या वतीने दासनवमी निमित्त दिला जाणारा राज्यस्तरीय ‘शिवसमर्थ पुरस्कार’ प्रेरणादायी वक्ते , इतिहास अभ्यासक दशरथ ननावरे यांना जाहीर झाला आहे.
पाटण तालुक्यातील सडादाढोली येथील रामघळ कुबडीतीर्थ ट्रस्टच्या वतीने गेले अनेक वर्षे सामाजिक , शैक्षणिक , क्रीडा व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ‘ शिवसमर्थ पुरस्कार ‘ देऊन सन्मानित केले जाते. यावर्षीचा हा पुरस्कार खंडाळा तालुक्यातील प्रेरणादायी वक्ते , इतिहासाचे अभ्यासक दशरथ ननावरे यांना देण्यात येणार आहे. सामाजिक , शैक्षणिक आणि ऐतिहासिक क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान महत्वपूर्ण आहे. समाजप्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती करून तरुण पिढीला विधायक मार्गावर आणण्यासाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्रात शिवचरित्र आणि सामाजिक विषयावरील व्याख्यांनातून समाज घडविण्याचा त्यांचा अखंड प्रयत्न राहिला आहे. तसेच शेकडो गडकिल्ल्यांच्या मोहिमेतून अभ्यासपूर्ण लेखन तसेच शिवचरित्रावरील प्रासंगिक लेखन केले आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच कोरोना काळात लोकांसाठी केलेले काम आणि अतिवृष्टीच्या काळात लोकांना केलेले सहकार्य या सर्वच बाबींचा विचार करून ट्रस्टने सन २०२४ चा हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
दासनवमी मंगळवार दि. ५ मार्च रोजी राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई , संतचरणरज बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.
