शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा पालकमंत्री शंभूराज देसाई ; मेढ्यातील मेळाव्यातून सुचक इशारा
मेढा प्रतिनिधी-जावळी तालुक्याने १९९५ मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिला शिवसेनेचा आमदार निवडून आणत इतिहास घडवला आहे. तालुक्यातील मातीत आजही शिवसेना रुजलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथील स्वाभिमानी शिवसैनिकाच्या “केसाला जरी धक्का लागला तरी याद राखा” असा सज्जड इशारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मेढा येथील मेळाव्यात बोलताना दिला.
मेढा येथे शिवसेनेचा मेळावा व जावळीचे सुपुत्र नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम यांचा नागरी सत्कार कार्यक्रमात पालकमंत्री देसाई बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अंकुश बाबा कदम, मुख्य प्रवक्ता-ज्योति वाघमारे,जिल्हा सहसंपर्क प्रमुख-एकनाथ ओंबळे,जिल्हा प्रमुख रणजित भोसले,उपजिल्हा प्रमुख संदीप पवार ,तालुका प्रमुख समीर गोळे,प्रशांत तरडे,शांताराम कदम,सातारा शहर प्रमुख निलेश मोरे,मेढा शहर प्रमुख संजय सुर्वे, सचिन करंजेकर, सुधीर करंदकर, प्रशांत जुनघरे, सचिन शेलार,गणेश निकम अमरदीप तरडे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले मेढातील व्यावसायिकाचा वार्षिक व्यवसाय अत्यल्प मात्र नगरपंचायतीची करपट्टीच अधिक भरावी लागत आहे. तर मेढ्यातील नागरिकांना दोन दिवसातून पाणी मिळत असेल तर ही मोठी शोकांतिका आहे. असा प्रश्न उपस्थित करत मग येथील लोकप्रतिनिधींनी नेमकं मेढा शहरासाठी काय केलं असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर सोमवारीच मेढा शहरातील करपट्टी संदर्भात मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री म्हणून मी प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही देसाई यांनी यावेळी दिली.
शिवसानिकांनो कामाला लागा
महायुतीमध्ये आमचाही पक्ष आहे.पण आमचाही कुणी स्वाभिमान दुखणार असेल व महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विचार केला गेला नाही तर स्वबळावर संपूर्ण ताकदीनिशी लढून मेढा नगरपंचायत व पंचायत समितीवर माझे शिवसैनिक भगवा झेंडा फडकवतील तो फडकवण्यासाठी मी सर्वतोपरी ताकद शिवसैनिकांना या पुढील काळात देईन.त्यामुळे न थांबता आता शिवसैनिकांनो कामाला लागा अशा सूचना देसाई यांनी यावेळी दिल्या.
जावळीचे सुपुत्र व नवी मुंबई संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम यांनी तालुक्यातील रोजगार व इतर मूलभूत प्रश्नांकडे लक्षवेधक जावळीतील नागरिकांचा स्वाभिमान जागा केला.रस्ते,गटर म्हणजे फक्त विकास का?रोजगरा अभवी इथला तरुण बेरोजगार होतोय मुबंईची वाट धरतोय मग तुमच्या इथल्या रस्त्यावर कोण चालणार आहे. असा प्रश्न उपस्थित करीत इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार द्या,पर्यटनाला गती द्या हा खरा शाश्वत विकास करणे गरजेचे आहे.
सहसंपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांनी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात भरीव निधी देत साधलेल्या विकासावर प्रकाश टाकला. आत्ताही उपमुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांच्याकडे जे-जे काम घेऊन गेलो, ते-ते काम त्यांनी मार्गी लावले असल्याचे सांगितले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक संघपणे ताकदिने या निवडणुका शिवसैनिकांनी लढण्यासाठी सज्ज व्हावे. असे आवाहन ओंबळे यांनी यावेळी केले.
दरम्यान या कार्यक्रमात उद्धव ठाकरे गटाचे मेढा शहरातील नेते सचिन जवळ यांनी आपल्या असंख्य तरुण कार्यकर्त्यांसमवेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदे गटात शक्ती प्रदर्शन करीत प्रवेश केला.




