देशाची लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा : मा. शरद पवार
वाई : देशात एका राज्यात हिंसाचार होतो . अत्याचार होतात, मात्र मोदी त्यावर साधे भाष्यही करत नाहीत. भ्रष्टाचार व सत्तेचा गैरवापर कसा करायचा याचे उदाहरण मोदींनी घालून दिले. आपल्या विरुद्ध बोलेल त्याला गजाआड करणे ही हुकूमशाही आहे. यामुळे आज देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. देशाची लोकशाही वाचवण्यासाठी इंडिया महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी वाई येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांची प्रचार सभा येथील भाजी मंडई येथे झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब भिलारे, रमेश धायगुडे, सागर साळुंखे, जिल्हाध्यक्ष सुमित माने, अभिनेत्री अश्विनी महांगडे, ऍड. वर्षा देशपांडे, अनिल जगताप, डी. एम. बावळेकर, राजकुमार पाटील, डॉ. नितीन सावंत, ऍड. विजय पिसाळ विराज शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले, मोदी भाषणामध्ये आपण काय केले, हे कधीच सांगत नाहीत, मात्र दुसऱ्यांनी काय केले नाही हे सांगतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी, हमीभाव, शेतकऱ्यांना स्वाभिमानाने उभे करण्याचे काम मी कृषी मंत्री असताना केली. मोदींनी जी ध्येयधोरणे राबवली, त्यामुळे देशात महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे.महागाई वाढवणाऱ्या सरकारला सत्तेत बसण्याचा अधिकार आहे का? तुम्ही राहुल गांधींवर टीका करता, नेहरूंवर टीकाकरता, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी 11 वर्षे तुरुंगात घालवली.टीका करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही.शशिकांत शिंदे त्यांच्यावर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. बाजार समितीवर ते कामगार प्रतिनिधी म्हणून होते. त्यांना कोणतेही अधिकार नसताना त्यांनी भ्रष्टाचार केलाच कसा? असेही ते म्हणाले.
शशिकांत शिंदे म्हणाले, खंडाळ्यामध्ये औद्योगिक क्षेत्र वाढलं आहे. परंतु स्थानिक तरुनाना संधी मिळत नाही. आमच्या लोकांच्या मागणी काय साताऱ्यामध्ये आयटी पार्क, इंडस्ट्री असावी, म्हणून माझ्या सर्वांना विनंती आहे. यावेळी मागच्या सारखाच इतिहास रचयचा आहे. माझा नेता, पृथ्वीराज बाबा, बाळासाहेब पाटील वगैरे सगळे मंडळी आम्ही आता लढतोय या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी.आम्ही लढतोय या देशाच्या लोकशाहीसाठी. आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून सात दिवस असं काम करा अशा पद्धतीने काम करा इतिहास घडवा. आता आपण पवार साहेबाना साथ देऊया. पुन्हा इतिहास घडवून आणू असा आपण शब्द साहेबांना देऊया. महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येईल ही जबाबदारी तुमची आहे.
यावेळी काँग्रेस राज्य सरचिटणीस राजेंद्र शेलार, संतोष बाबर, सुनील गव्हाणे, राणूअक्का फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे, संदीप देसाई, शिवसेना जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते, भारत पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले.