विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे- प्रा.डॉक्टर राजन मोरे
सातारा : विज्ञान प्रदर्शन हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी राज्य व देशपातळीवर स्कुलचे नाव उंचवावे. विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती व वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करण्याचे काम झाले म्हणजे प्रदर्शनाचा उद्देश सफल होईल, असे प्रतिपादन सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे डीन प्रा.डॉ. राजन मोरे यांनी केले.
शाहूपुरी हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीनिधी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी होते. मुख्याध्यापिका मंजुषा बारटक्के, उपमुख्याध्यापिका शिल्पा पाटील उपस्थित होते.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल सुरु असून, विद्यार्थ्यांमधून भविष्यातील शास्त्रज्ञ तयार व्हावेत अशी अपेक्षा अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
प्रा.डॉ. राजन मोरे यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शनात नर्सरी, प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विज्ञान, भूगोल व पर्यावरण प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सुमारे २२० प्रकल्प सादर केले. प्रदर्शनात पूर नियंत्रण यंत्र, जलविद्युत निर्मिती, अपघात सूचक यंत्र, ध्वनीपासून वीजनिर्मिती अशा विविध वैज्ञानिक प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये रेशीम उत्पादन प्रोजेक्ट सुद्धा होता. विद्यार्थ्यांनी स्वतः रेशमी किड्याच्या अंड्यांपासून ते रेशमी कोश इथपर्यंतचा प्रवास दाखविला. या प्रकल्पाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
आज दिवसभर विज्ञानप्रेमी शिक्षक, पालक व विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.
इयत्ता सातवी चा कुमार इम्तियाज रफिक मुल्ला याने प्रास्ताविकात प्रदर्शन भरविण्याचा उद्देश स्पष्ट केला. त्याचप्रमाणे त्याने पाहुण्यांचे स्वागत व सूत्रसंचालन केले.
