अपंग सेवा केंद्राच्या मदतीसाठी साताऱ्यात गीतांचा कार्यक्रम
तिकीट विक्री शाहू कला मंदिर येथे उपलब्ध
सातारा : करूनाड कला केंद्राच्या वतीने अपंग सेवा केंद्राच्या मदतीसाठी १५ ऑक्टोबर रोजी शाहू कला मंदिरात सुमधुर हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला सातारा हॉस्पिटल अँड डायग्नोस्टिक सेंटरचे चेअरमन व कार्यकारी संचालक डॉ.सुरेश शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
सांगलीच्या अपंग सेवा केंद्राच्या मदतीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी तेजोनिधी होमिओपॅथीक क्लिनिकचे कार्यकारी संचालक डॉ. जवाहरलाल शहा, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. महानंदा शेटे, मिलिटरी कॅंटीनचे व्यवस्थापक निवृत्त कमांडर राजेंद्र शिंदे, निवृत्त कर्नल गजानन राडकर, राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या निवृत्त अधिकारी मीनाक्षी बिराजदार आदी मान्यवर प्रमुख उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता शाहू कला मंदिरात होणार आहे. कार्यक्रमात गीता जोगळेकर, मिलिंद जोगळेकर, राजीव वाली, रेखा माने, ममता नरहरी, पौर्णिमा गीते व ममता तायशेटी कला सादर करणार आहेत. सामाजिक बांधिलकीतून नागरिकांनी या कार्यक्रमाला सढळ हाताने मदत करावी आणि सुमधुर गीतांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
